breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका…”, देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली आठवण; संजय राऊतांनाही लगावला टोला!

मुंबई |

‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमावरून सध्या देशभर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही भागात या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील इतर काही राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील हा सिनेमा टॅक्सफ्री करण्यात यावा, अशी मागणी थेट राज्याच्या विधानसभेत देखील करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मागणी फेटाळून लावल्यानंतर त्यावरून भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला असून बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. कश्मीर फाईल्स चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी फेटाळताना अजित पवारांनी केंद्र सरकारने हा चित्रपट करमुक्त केल्यास संपूर्ण देशातच तो करमुक्त होईल, असं उत्तर दिलं. यावरून विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

  • “…तर काही लोकांना मिर्ची का लागते?”

“महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरेंच्या सरकारचं वर्तन यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काश्मीरची काय अवस्था होती, हे ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे. मी स्वत: वयाच्या १८व्या वर्षी मी काश्मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेत, ते मीही जवळून बघितलं आहे. असं देशातलं सत्य एखाद्या सिनेमामुळे समोर येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते? ती यासाठी लागते की त्या वेळची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, जनविरोधी होती, देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो”, असं फडणवीस म्हणाले.

  • संजय राऊतांना खोचक टोला

दरम्यान, “चित्रपट टॅक्सफ्री करून वेदना दाखवता येत नाहीत”, अशा शब्दांत या प्रकरणावर प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊतांना फडणवीसांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे? ते कधी काश्मीरमध्ये गेले होते? या संघर्षाच्या काळात ते कधीच काश्मीरला गेले नाहीत. सत्य पहिल्यांदा बाहेर येतंय. ते बाहेर आल्यामुळे अलिकडच्या काळात संजय राऊत ज्यांची वकिली करतात, त्यांचे चेहरे उघडे पडत आहेत. त्याची चिंता संजय राऊतांना दिसते आहे”, असं फडणवीस म्हणाले.

  • “कोण होतास तू, काय झालास तू?”

“संजय राऊतांना आणि शिवसेना पक्षाला मला विचारायचंय. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू अशी अवस्था तुमची का दिसतेय? कुठे ते बाळासाहेबांचं जाज्वल्य हिंदुत्व जे काश्मिरी पंडितांच्या पाठिशी उभं राहायचं आणि आज काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला, तरी तुम्हाला मिर्ची लागते. इतके का बदललात तुम्ही? काय कारण आहे असं बदलण्याचं?” असा खोचक सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button