ताज्या घडामोडीमुंबई

मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेचा बडगा

मुंबई | करोना संसर्गामुळे झालेला भरमसाठ खर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधांना निधीअभावी फटका बसू नये यासाठी पालिका प्रशासनाने कर वसुलीसाठी बडय़ा थकबाकीदारांविरुद्ध बडगा उगारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रोच्या आठ स्थानकांसह ११ ठिकाणांवर जप्ती आणि अटकावणीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर तात्काळ दुसऱ्याच दिवशी अंधेरी परिसरातील एक मोठी सोसायटी, मॉल आणि क्लबवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे अंधेरीमधील ओशिवरा लिंक प्लाझा कमर्शिअल सोसायटी, जी-७ मॉल आणि जुहूमधील कमर्शिअल मिलेनिअम क्लबला पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने जप्ती आणि अटकावणीची नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतरही मालमत्ता कर न भरल्यामुळे पालिकेने या तिघांवरही शुक्रवारी कारवाई केली, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ओशिवरा लिंक प्लाझा कमर्शिअल सोसायटीने ७ कोटी ८१ लाख रुपये, जी-७ मॉलची २२ कोटी ८३ लाख रुपये, तर कमर्शिअल मिलेनिअम क्लबची एक कोटी ३३ लाख रुपये थकबाकी आहे. या तिघांनीही दिलेल्या मुदतीत करभरणा न केल्यामुळे करनिर्धारण व संकलन विभागाने नोटीस बजावली होती. मात्र तरीही कराची रक्कम न भरल्यामुळे पालिकेने अखेर शुक्रवारी सकाळी ओशिवरा लिंक प्लाझा कमर्शिअल सोसायटी आणि जी-७ मॉलची मलनि:स्सारण वाहिनी खंडित केली. तसेच कमर्शिअल मिलेनिअम क्लबचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद झाला. त्याखालोखाल अधिक महसूल मिळवून देणारा मालमत्ता कर आता पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. करोना संकटाचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवरही झाला आहे. तसेच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरात वास्तव्य करणाऱ्यांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. त्याचाही मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन करनिर्धारण आणि संकलन विभागाने गेली अनके वर्षे थकलेल्या कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. चालू आर्थिक वर्षांत (२०२१-२२) मालमत्ता करापोटी ४,८०० कोटी रुपये उत्पन्न वसुलीचे उद्दीष्टय़ करनिर्धारण व संकलन विभागासमोर आहे. त्यामुळे विभागाने बडय़ा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button