पिंपरी / चिंचवड

सुस्थितीतील रस्त्यांवर वेगवेगळी कामे करून शेकडो कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा सत्ताधा-यांचा डाव : शिवसेना गटनेता राहुल कलाटे

– सत्ताधारी भाजप इलेक्शन फंड गोळा करतय का ?

– ही लूट कशासाठी ? कलाटे यांचा पालिका आयुक्तांना सवाल

पिंपरी l प्रतिनिधी

औंध-रावेत बीआरटी रोड पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर वेगवेगळी कामे करून त्यातून शेकडो रुपयांची लूट करण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी डाव आखला असून गरज नसताना शेकडो कोटी रुपयांची कामे का दिली, असा सवाल शिवसेना गटनेता, नगरसेवक राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे.

राहुल कलाटे यांनी माध्यम प्रतिनिधींसह औंध – रावेत या बीआरटी रोडने प्रवास केला. प्रवासात रस्त्यावर एकही खड्डा आढळला नाही. रस्ता सुस्थितीत असल्याचे या प्रवासादरम्यान आढळले. असे असताना रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढले आहे. एक ऑक्टोबर 2021 रोजी रोडची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली. डांबरीकरण आणि चेंबर समतलीकरण यासाठी 30 कोटी रुपये, काळेवाडी फाटा ते डांगे चौक अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईन करणे या नावाखाली 16 कोटी रुपये, ताथवडे ते पुढील भागासाठी 14 कोटी रुपये अशी एकूण 60 कोटी रुपयांची निविदा पूर्ण केली. शिवाय 40 कोटी रुपयांचे थेट काम बी जी शिर्के कंपनीला देण्याचा सत्ताधा-यांनी घाट घातला आहे, तो शेवटच्या टप्प्यात असल्याचे नगरसेवक कलाटे यांनी सांगितले.

100 कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे चार टप्प्यात विभागून ही रक्कम खर्च केली जाणार आहे. वास्तविक या रस्त्यावर कोणतेही काम करण्याची आवश्यकता नाही. तरीदेखील जनतेच्या कररूपी शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. हे करताना काही अधिका-यांनी आयुक्तांची दिशाभूल केली आहे. सत्ताधारी प्रशासनावर दबाव टाकून या कामाच्या नावाखाली इलेक्शन फंड गोळा करत असल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे.

या रस्त्यावरून प्रवास केला असता एकही खड्डा लागला नाही. तरीही चेंबर समतलीकरण करण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आयुक्तांनी ही उधळपट्टी थांबवावी. स्मार्ट सिटी अंतर्गत बीजी शिर्के कंपनीला जे काम दिले आहे त्यालाच जोडून काळेवाडी फाट्यापर्यंत जे काम देत आहात त्याबाबत आयुक्तांनी कळवावे, असे पत्र दहा दिवसांपूर्वी दिले असल्याचे नगरसेवक कलाटे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button