breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नवाब मलिकांनी ऐकवली ऑडिओ क्लिप; समीर वानखेडेंवर केला गंभीर आरोप

मुंबई | प्रतिनिधी 
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका कथित ऑडिओ क्लिपचा हवाला देत समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून जुना बदलण्याचा कारनामा सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला असून, माझ्यावर दबाब आणण्यासाठी जावयाच्या जामीनाला आव्हान दिलं असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, “गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर म्हणजे आर्यन खान केसपासून एनसीबीकडून सुरू असलेला फर्जिवाड्याचा पर्दाफाश केला. आर्यन खान केसमधील केपी गोसावी, भानुषाली, कागदांवर सह्या घेणं, 25 कोटींची खंडणी या सगळं समोर आणलं आहे. त्यावर एनसीबीने चौकशीसाठी खात्यातंर्गत चौकशी समिती नेमली. एसआयटी नियुक्त करण्यात आली, त्याचं काय झालं अजून कुणाला माहिती नाही”, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

“एनसीबीचा बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या एका पंचाला कॉल करतो. त्याचा ऑडिओ ऐकवला आहे. तो अधिकारी सांगतोय की या आणि मागच्या तारखेचा पंचनामा दुरूस्त करा. कार्यालयात अडचणीचं होईल. त्यामुळे तो अधिकारी त्याला बाहेर भेटून सह्या करू असं सांगतोय. मॅडी नावाचा पोरगा घाबरून वानखेडेंना कॉल करतो. वानखेडे सांगतात जा, काही घाबरण्याचं कारण नाही. फर्जिवाडा करून पंचनामा बदलण्याचा उद्योग एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे. कोऱ्या कागदावर सह्या घ्यायच्या हा घातक फर्जिवाडा आहे”, असा दावा मलिक यांनी केला आहे.

“आम्ही हे सगळं उघड केल्यानंतर एनसीबीचा अधिकारी अडचणीत येणार असल्याने मागचा पंचनामा दुरुस्त करण्याचा उद्योग या विभागाच्या माध्यमातून होत आहे. पीआर एजन्सींना ड्रग्ज पेडलर, स्मगलर्स पैसे पुरवत आहेत. त्यांच्या माध्यमातून बातम्या पेरण्याचा धंदा या एजन्सीने सुरू केला आहे. एनसीबीने फक्त समीर खानच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सगळ्या आरोपींच्या विरोधात का न्यायालयात गेले नाहीत. माझ्या मनात भिती निर्माण करण्यासाठी समीर खानच्या विरोधात न्यायालयात गेले आहात का?,” असा प्रश्न मलिक यांनी एनसीबीला केला आहे.

“ज्या पद्धतीने शाहरूख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला. माझ्या कुटुंबियांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला. नवाब मलिक घाबरणार नाही. नवा फर्जिवाडा समोर आणतोय. एजन्सीबद्दल काही असेल, तर मला बोलण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्याच अधिकारात मी बोलतोय. समीर वानखेडे आणि पीटी बाबूने पंचनामा बदलण्याचा कारनामा केला आहे. त्यावर काय कारवाई करणार आहात, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे,” असा हल्लाबोल मलिक यांनी केला.

“मी मुदतवाढ मागत नाही, अशा बातम्या एका आठवड्यांपासून पेरल्या जात आहेत. सुट्टीवर जाणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना (समीर वानखेडे) मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचे महाराष्ट्राचे, मुंबईचे महत्त्वाचे नेते केंद्रीय गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुदतवाढ देऊ नका. या अधिकाऱ्याने बेकायदेशीर कामं केली आहेत, असे अहवाल असताना भाजपच्या काही नेत्यांचा त्यांना इथे ठेवण्यात रस आहे, म्हणजेच वसुली गँगमध्ये त्यांचाही हिस्सा आहे,” असं मलिकांनी म्हटलं आहे.

“त्यांना इथे ठेवलं, तर त्यांचा फर्जिवाडा समोर आणण्याची संधी आम्हाला मिळेल, पण ज्या पद्धतीने इतकं होऊनही हे मुजोर अधिकारी पंचनामा बदलत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः पत्र लिहिणार आहे. न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाईन. टप्प्याटप्प्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे आणखी घोटाळे मी बाहेर काढणार आहे. माझा प्रश्न आहे की, पंचनामा बदलण्यासाठी कटकारस्थान सुरू होतं का? याची लेखी तक्रार आणि व्हिडीओ आम्ही सादर करणार आहोत. या केसमध्ये करण सजलानी आणि इतरांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज का केला नाही, असा माझा एनसीबीला सवाल आहे,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button