ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#AttackOnSilverOak: शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवरील हल्ल्यामागे नेमके कारण काय?; राज्यमंत्री आशुतोष काळे म्हणाले..

शिर्डी |  महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने विरोधी पक्षाकडून होत आहे. सिल्व्हर ओकवर हल्ला हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो असा आरोप कोपरगाव विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्यमंत्री आशुतोष काळे यांनी केला आहे. कोपरगाव येथे काळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने आंदोलन करत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

न्यायालयाच्या निकालानंतरही काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पवार यांच्या निवासस्थानी गोंधळ घालत दगड आणि चप्पल भिरकावल्या. यावेळी शरद पवार स्वतः सिल्व्हर ओक येथे उपस्थित होते. यातील अनेक आंदोलकांसह ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत घटनेचा निषेध केला आहे. काळे यांनी विरोधी पक्षाकडे बोट दाखवत घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी काळे म्हणाले की, कोर्टाने निकाल दिल्यानंतरही आंदोलकांनी अशी प्रतिक्रिया देणे अपेक्षित नव्हते. काही राजकीय पक्ष या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी काम करत आहेत. पवार साहेबांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र आणून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार पाडण्यासाठी दररोज मुहूर्त काढले जात आहेत. मात्र हे सरकार पडण्या ऐवजी अधिक मजबुतीने काम करत असल्याचे गेल्या अडीच वर्षांत दिसून आलंय.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्र्यांनी कोविड काळात चांगले काम केले. राज्याच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतल्याने सरकारबद्दल चांगली जनभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष सातत्याने करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा हल्ल्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आशुतोष काळे यांनी केली. असे हल्ले महाराष्ट्राला शोभनीय नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button