ताज्या घडामोडीमुंबई

सिल्व्हर ओकवर हल्ला, सरकार खडबडून जागं, शरद पवारांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेणार

मुंबई | देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार खडबडून जागं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत शरद पवार आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या पवारांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे, त्यामुळे त्यांच्या आणि पवार कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबत काहीच वेळात निर्णय होऊ शकतो.

एसटी आंदोलकांनी सिल्वर ओकवर केलेल्या उग्र आंदोलनानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सकाळपासून मुंबईत महाविकास आघडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. काही वेळापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. तेथून बाहेर पडताना त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या होत्या. गृहविभागाच्या कारभारावर त्यांनी बोट ठेवलं. यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांनीही सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

चौफेर टीकेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अॅक्शन मोडवर आले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला लक्ष्य केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिथून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले तसंच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही त्यांनी बातचित केली. या सगळ्या घटनेनंतर आता पवारांची सुरक्षा वाढविण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आलं आहे.

“एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरी लोकं प्लॅनिंग करुन जातात. प्रसार माध्यमांना खबर लागते. ते वेळेत पोहोचतात. मात्र मुंबई पोलिसांना याची खबर लागत नाही. ते वेळेत पोहोचत नाही. गृहविभागाचं हे मोठं फेल्युअर आहे, खरंतर त्यांची चौकशी झाली पाहिजे”, असं म्हणत फडणवीसांनी वळसे पाटलांवर आणि गृह विभागाच्या कामावर बोट ठेवलं.

शरद पवार आणि कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था वाढवणार

एसटी कर्मचाऱ्यांचा जत्था काल सिल्वर ओकवर चाल करुन गेला. यावेळी तिथे असलेली सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोकडी होती. साहजिक एवढ्या मोठ्या जमावापुढे पोलिसांचं काही चाललं नाही. जमावाने बॅरिकेट तोडून पवारांच्या घराच्या दिशेने चप्पल, दगड भिरकावले. काही वेळानंतर सुप्रिया सुळे कर्मचाऱ्यांशी बाचचित करण्यासाठी घराच्या अंगणात आल्या. त्यांनाही धक्काबुक्की झाली. एकंदरित काल पवार आणि पवार कुटुंबियांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांची देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे.

पवारांचा उद्या नागपूर दौरा, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणार- नागपूर पोलिस आयुक्त

शरद पवार आज साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला होता. उद्या शरद पवार नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्या दिमतीला कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल.

शरद पवार उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते नागपूर विमानतळावर पोहोचतील. तिथे पवारांच्या स्वागताला हजारो समर्थक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच पवारांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय नागपूर पोलिस देखील पवारांना अतिरित्य सुरक्षा व्यवस्था पुरविणार आहेत, अशी माहिती नागपूर पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button