मुंबई| एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात शांततेत आंदोलन सुरू असताना अचानक कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोड येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता तपासाला वेग आला असून तपासातून रोज नव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पवारांच्या घरावर चाल करून जाणारे काही आंदोलक दारूच्या नशेत होते, असा संशय होता. त्यावरून रक्ताचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळून आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११६ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी आज शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती दिली. पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळले आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. ८ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्याच्या आदल्या दिवशी ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला २० ते २५ जण उपस्थित होते, असेही तपासातून समोर आले आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्यांना सध्या मुंबई येथून सातारा येथे नेण्यात आले आहे. तिथे दाखल गुन्ह्यात पोलीस तपास सुरू असून सध्या सदावर्ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कोठडी आजच चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे असा हल्ला करण्याची सूचना गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस दप्तरी त्या सध्या वॉन्टेड आहेत. मुंबई पोलिसांचे संरक्षण त्यांनी सोडले असून सध्या त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांना हुडकण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.