As soon as his brother became the Chief Minister, Raj Thackeray was bothered by bongs, this is stomach ache, Raut's criticism
हडपसर (पुणे) |मागील १५ वर्ष राज ठाकरे यांना भोंग्याचा त्रास झाला नाही, मग भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्यांना भोंग्याचा त्रास कसा व्हायला लागला, ही तर पोटदुखी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कोरोनापासून पोटदुखीपर्यंत सगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी सक्षम आहे, असं सांगायला देखील राऊत विसरले नाहीत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यातल्या हडपसर येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामे, हिंदुत्व, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबरची दोस्ती ते सध्याचा ट्रे़ंडिंग विषय असलेल्या भोंग्यावर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोले लगावले.
संजय राऊत म्हणाले, “हा महाराष्ट्र लेचा पेच्यांचा नाही. हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे. आताही माझ्या सभेवेळी भोंगा सुरु आहे ना… कुणाला त्रास होतोय का? आजूबाजूला लोकं ऐकतायेत ना, मला गंमत वाटते, गेले १५ वर्ष त्यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही. आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भोंग्याचा त्रास का झाला?? हा प्रश्न आहे ना…..”
“राज ठाकरेंना १५ वर्ष त्रास झाला नाही का, मग त्यांनी त्या-त्यावेळी का आवाज उठवला नाही. विलासराव देशमुख यांचं सरकार होतं, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, नंतर त्यांचे लाडके फडणवीस यांचंही सरकार सत्तेत होतं, मग त्यावेळी त्रास का झाला नाही?, आताच त्रास का व्हायला लागला. कारण भाऊ मुख्यमंत्री झाला ना… ही त्यांची पोटदुखी आहे. पण काळजीचं कारण नाही, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कोरोनापासून पोटदुखीपर्यंत सगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी सक्षम आहे”, असं सांगायला राऊत विसरले नाहीत.