ताज्या घडामोडीपुणे

आर्या तावरे ‘फोर्ब्स’च्या यादीत

पुणे |अवघ्या २२ व्या वर्षी ‘स्टार्टअप’ सुरू करून ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या आर्या तावरे या लंडनस्थित मराठी तरुणीच्या कामगिरीची दखल ‘फोर्ब्स’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिकाने घेतली आहे. ‘फोर्ब्स’च्या युरोपमधील वित्तपुरवठा वर्गवारीतील ३० वर्षांखालील पहिल्या ३० व्यक्तींच्या यादीत आर्याचा समावेश झाला आहे.

मूळ बारामतीची असलेली आर्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची कन्या आहे. कुटुंबाच्या बांधकाम व्यवसायाच्या पार्श्वभूमीमुळे आर्याला वास्तूकला व नियोजन विषयात आवड निर्माण झाली. पुण्यातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून ‘अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट फायनान्स’ या विषयात पदवी संपादित केली. ‘महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सुट्टीच्या काळात आर्याने लंडनमधील बांधकाम व्यावसायिकांकडे काम केले. त्या वेळी तेथील लघू व मध्यम बांधकाम विकसकांना निधी उपलब्धतेच्या समस्या भेडसावत असल्याचे तिच्या लक्षात आले. या समस्या सोडविण्यासाठी तिने ‘क्राउड फंडिंग’ संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाने तिला प्रोत्साहन देऊन स्वतंत्र कार्यालय व यंत्रणा उपलब्ध करून दिली,’ असे आर्याचे वडील कल्याण तावरे यांनी सांगितले.

 

विद्यापीठातून उत्तीर्ण झाल्यावर आर्याने ‘फ्युचरब्रिक्स’ नावाने ‘स्टार्टअप’ सुरू केला. या ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून यूकेमधील लघू व मध्यम आकाराच्या बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून दिला जातो. ‘आर्याचा स्टार्टअप वेगाने विस्तारत असून, तिच्या कंपनीचे मूल्य साडेतीनशे-चारशे कोटींवर पोहोचले आहे. अनेक मोठ्या वित्तपुरवठा कंपन्या तिच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. त्याची दखल ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली असून, त्यांच्या यादीतील युरोपीय व्यक्तींमध्ये ती एकमेव आशियाई वंशाची तरुणी आहे,’ असेही कल्याण तावरे यांनी अभिमानाने नमूद केले. ब्रिटनचे पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, त्या वेळी त्यांच्या शिष्टमंडळातही ती सहभागी झाली होती, असेही कल्याण तावरे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘फोर्ब्स’सारख्या आंतरराष्ट्रीय मासिकाने आर्याच्या कामगिरीची दखल घेणे हा आमच्यासाठी सुखद आश्चर्याचा धक्का होता. ‘फोर्ब्स’ मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आर्याच्या रूपाने मराठी मुलीचा समावेश झाला असून, तिच्या कंपनीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे, असं करण ग्रुप प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे अध्यक्ष कल्याण तावरे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button