breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

दोनशे वाहने चोरणा-या अट्टल चोरट्यांना अटक; 36 लाखांच्या 51 दुचाकी हस्तगत

पिंपरी-चिंचवड |

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने दोन अट्टल वाहन चोरट्यांना अटक केली. त्यातील एका चोरट्यावर तब्बल 200 वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही चोरट्यांकडून पोलिसांनी 36 लाख रुपयांच्या 51 दुचाकी हस्तगत केल्या. सतत दोन महिने तपास करून साडेचारशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करून पोलिसांनी गुन्ह्यांची उकल केली आहे. शंकर भीमराव जगले (वय 20, रा. हारगुडे वस्ती, चिखली), संतोष शिवराम घारे (वय 39, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहनचोरीचे गुन्हे घडत असल्याने दरोडा विरोधी पथकाने सतत दोन महिने तपास करून साडेचारशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तळेगाव दाभाडे येथे दोन संशयित येत असून ते या भागातील राहणारे नाहीत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपी जगले व आरोपी घारे या दोघांना 26 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. पोलीस तपासात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे दोघांनी सांगितले. त्यांच्याकडून 51 दुचाकी, एक आटो रिक्षा, एक मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी संतोष घारे हा वयाच्या सतराव्या वर्षापासून वाहनचोरी करीत आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर व नाशिक येथे 200 वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी शंकर जगले हा देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात तो 2015 पासून फरार होता. त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, वाहनचोरी, मोबाइल चोरी, घरफोडी, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी दुचाकी चोरीसाठी मास्टर चावीचा वापर करीत असत. मौजमजेसाठी गाड्या चोरी करून ती वाहने गहाण किंवा विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button