breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्रिसदस्यीय पॅनेलप्रमाणे प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे महापालिकेला आदेश

  • शहरात 128च नगरसेवक; प्रभागाची संख्या राहणार 43

पिंपरी – राज्य मंत्रिमंडळाने आगामी महापालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 128 च राहणार आहे. एकूण 43 प्रभाग राहणार असून 42 प्रभागात 3 नगरसेवक तर 1 प्रभागात 2 नगरसेवक असणार आहेत.

राज्य सरकारने एका प्रभागासाठी एक नगरसेवक या पद्धतीने निवडणूक घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. परंतु, राज्य सरकारने तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. सरकारने हा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविला. त्यांच्या स्वाक्षरीनंतर 30 सप्टेंबर रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तीनच्या प्रभागाचे कायद्यात रूपांतर झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने मंगळवारी त्रिसदस्यीय पॅनेलप्रमाणे प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले.

2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी) 2 लाख 73 हजार 810 तर अनुसूचित जमाती (एसटी) 36 हजार 535 लोकसंख्या आहे. 128 नगरसेवक असणार आहेत. एकूण 43 प्रभाग राहणार आहेत. 42 प्रभागात 3 तर एका प्रभागात 2 उमेदवार असणार आहेत. प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील.

अशी होणार प्रभाग रचना!

प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकडी त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी.

प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊव निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन होणार नाही. याची दक्षता घ्यावी. मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हेनंबर यांचे उल्लेख यावेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button