Mahaenews

मदतीसाठी आरडाओरड आणि नंतर..; खो-खो खेळाडूवरील बलात्काराची ऑडिओ रेकॉर्डिंग; पीडितेचा मृत्यू

मदतीसाठी आरडाओरड आणि नंतर…; खो-खो खेळाडूवरील बलात्काराची ऑडिओ रेकॉर्डिंग; पीडितेचा मृत्यू

Share On

उत्तर प्रदेश |

उत्तर प्रदेश पोलिसांनी २४ वर्षीय राष्ट्रीय खो खो खेळाडूच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. बिजनोरमध्ये रेल्वे स्थानकावर तिचा मृतदेह आढळला होता. पीडितेच्या मैत्रिणीने शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटना घडली तेव्हा पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत बोलत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १० सप्टेंबरला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नोकरीसाठी मुलाखत देऊन घरी परतत असताना ही घटना घडली. आरोपी शाहजाद उर्फ हदीम हा रेल्वे स्थानकावर कामगार असून त्याने पीडितेवर जबरदस्ती करत बलात्काराचा प्रयत्न केला.

आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलणाऱ्या पीडितेने मदतीसाठी आरडाओरड सुरु केली असता आरोपीने तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. पीडितेच्या मैत्रिणीने मदतीसाठी झालेली आरडाओरड ऐकली आणि नंतर सर्व काही शांत झालं होतं. आरोपीने पीडितेला तिथेच सोडून तिच्या मोबाइलसहित घटनास्थळावरुन पळ काढला होता. यानंतर स्थानिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिचा मृतदेह आढळला होता. कुटुंबाने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता.

आरोपीने घऱी पोहोचल्यानंतर मोबाइल स्वीच ऑफ केला होता. पण पोलिसांनी त्याचं शेवटचं लोकेशन मिळवत घऱी पोहोचून त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांना घटनास्थळी स्लिपर आणि आरोपीच्या शर्टची तुटलेली दोन बटणं सापडली होती. आरोपीच्या शर्टावर रक्ताचे डाग होते जे त्याच्या पत्नीने धुवून घालवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेच्या मैत्रिणीने पोलिसांना कॉल रेकॉर्डिंग दिलं, ज्याच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. पीडितेने बचाव करताना आरोपीच्या शऱीरावर सोडलेल्या नखांच्या खुणाही आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी आहे. त्याला ड्रग्जचं व्यसन आहे. रेल्वे स्थानकावर लोकांकडून वस्तू चोरल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर याआधी चार गुन्हे दाखल आहेत. सुरुवातील रेल्वे पोलीस याप्रकरणी तपास करत होतं, पण नंतर बिजनोर पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला. पोलिसांनी तीन दिवसांत गुन्ह्याची उकल केल्याने पोलीस अधीक्षक धरमवीर सिंह यांनी २५ हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

Exit mobile version