Answer to Raj Thackeray, who calls Pawar a racist, was presented by Pawar himself, a history of 23 years
कोल्हापूर |राष्ट्रवादीच्या जन्मानंतर म्हणजेच १९९९ नंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात बोलताना केला. शरद पवार यांच्या राजकारणाला त्यांनी जातीयवादी राजकारण असल्याचं म्हटलं. तसंच पवारांना देखील असंच राजकारण अपेक्षित असल्याची टीकाही केली. राज ठाकरेंच्या या गंभीर टीकेला पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देताना राष्ट्रवादीच्या जन्मानंतरचा सगळा इतिहास समोर मांडला.
राष्ट्रवादीच्या जन्मानंतरची पक्षातील नेत्यांची यादी वाचून दाखवताना त्यांनी विविध जाती-धर्मातील नेत्यांची नावं सांगितली. यामध्ये मधुकर पिचड, छगन भुजबळ, अरुण गुजराथी, अजित पवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. ही नावं सांगण्याचं कारण म्हणजे विविध जातीच्या नेत्यांना पवारांनी नेतृत्व करण्याची दिलेली संधी… हाच मुद्दा पुढे नेत विविध जातीजमातीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा राष्ट्रवादीचा दृष्टीकोण आहे आणि पुढेही राहील, असंही पवारांनी ठणकावून सांगितलं.
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात पक्षाचं नेतृत्व कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानसभा घ्या किंवा विधान परिषद घ्या. पहिल्यांदा मला वाटतं छगन भुजबळ नेते होते. नंतर मधुकर पिचड नेते झाले, जे आदिवासी समाजातील होते. भुजबळ ओबीसी होते. नंतर अरुण गुजराथींच्या हातात धुरा होती. यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली. कारण अजित पवारांना 30 वर्ष विधीमंडळात येऊन झाली होती. 30 वर्ष काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी, तोच हेतू ठेऊन ही निवड झाली. तशी मागणी देखील इतर सदस्यांनी केली होती, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या जन्मानंतरचा इतिहासच पवारांनी राज्यासमोर मांडला.
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला, राज ठाकरेंचा पुनरुच्चार
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचंही म्हटलं. हेच राजकारण पवारांना अपेक्षित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार? असा सवालही केला. ते गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते.