breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आणखी एक शेतकरी आंदोलन, ८ जून पासून परळी वैजनाथ येथून सुरुवात

अहमदनगर : पुणतांबा येथे एक जूनपासून किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच दरम्यान राज्यात आणखी एक शेतकरी आंदोलन सुरू होत आहे. पीक विमा आणि अन्य प्रश्नांसाठी ८ जूनपासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून आंदोलन सुरू करण्याचा इशारा किसान सभेतर्फे देण्यात आला आहे. किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली.

बीड जिल्ह्यातील परळी येथे ८ जून २०२२ रोजी पत्रकार व पीक विम्याचे अभ्यासक पी. साईनाथ यांच्या उदघाटनपर भाषणाने परिषद सुरू होईल. त्यातूनच या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातील किसान सभेचे सर्व प्रमुख नेते व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. राज्यभरामध्ये पीक विमा क्षेत्रात कार्यरत असलेले पक्षविरहित कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, नेते, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पीक विमा कार्यकर्ते यांना परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असे नवले यांनी सांगितले.

आपत्ती काळात शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी सध्याच्या पीक विमा योजनेत मूलभूत बदल करावेत, येऊ घातलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे सर्वंकष संरक्षण मिळेल यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुरेशी काळजी घ्यावी, २०१९ पासून थकीत असलेली पीक विमा भरपाई विमा कंपन्यांकडून तत्काळ वसूल करून ती शेतकऱ्यांना देण्यात यावी, ३० मे नंतर शेतात उभ्या असलेल्या उसाला एकरी ४० टन याप्रमाणे एफ.आर.पी. इतकी रक्कम भरपाई म्हणून द्यावी, अशा मागण्या किसान सभेने केल्या आहेत.यासह कर्जमुक्ती, खरीप तयारी, वीजबिल मुक्ती, शेतीमालाला भाव या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेने राज्यभर रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. परळी येथील परिषद झाल्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख विभागांमध्ये अशा प्रकारच्या परिषदा घेऊन व्यापक शेतकरी आंदोलन उभे करण्याच्या बद्दल नियोजन करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button