Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडाविदर्भ

राज्यातील आणखी एका बँकेला ९७ लाखांचा गंडा; असा उघडकीस आला अपहार

नागपूर: आयडी व पासवर्डचा गैरवापर करून महिला लिपिकाने देवनगरमधील यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ९७ लाखांची फसवणूक केली आहे. बजाजनगर पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल करून महिला लिपिकाला अटक केली आहे. स्नेहा प्रकाश दाणी ऊर्फ स्नेहा तुषार नाईक (वय ३५, रा. सत्य अपार्टमेंट, मनीषनगर), असे तिचे नाव आहे. तिचा पतीही एका सोसायटीत कार्यरत आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, स्नेहा ही २०१५मध्ये देवनगर शाखेत लिपिकपदी रुजू झाली. तिने बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. अधिकाऱ्यांकडून संगणकांचे लॉगिन आणि पासवर्ड घेतला. त्यानंतर तिने पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक व गोदावरी को-ऑपरेटिव्ह बँकेत पती तुषार, तिचे आई-वडील तसेच अल्पवयीन मुलगा व पतीच्या नावे खाते उघडले. ग्राहकांच्या मुदतठेवीवर मिळणारे व्याज व ग्राहकांच्या खात्याची माहिती घेतली. पासवर्डच्या आधारे २०१६ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत तिने नातेवाइकांच्या खात्यात ९७ लाख ६३ हजार ३१३ रुपये वळते केले.

दरम्यान, व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे केल्या. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता स्नेहाने ग्राहकांच्या खात्यातील रक्कम नातेवाइकांच्या खात्यात जमा केल्याचे समोर आले. स्नेहाला निलंबित करण्यात आले. बँकेचे विभागीय अधिकारी सतीश श्रीधर जोशी यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. बजाजनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी तपास करून स्नेहाला अटक केली. तिची २३ मेपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

असा उघडकीस आला अपहार

फेब्रुवारी महिन्यात बँकेने सॉफ्टवेअर अपडेट केले. कर्मचाऱ्यांचे संगणकही अपडेट करण्यात आले. यावेळी दोन महिन्यांत यवतमाळ अर्बनमधून स्नेहाच्या नातेवाइकांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा होत असल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी २०१६पर्यंतचा व्यवहार तपासला असता तीन खात्यांमध्ये ९७ लाख रुपये वळते झाल्याचे उघडकीस आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button