संतापजनक! शाळेतच विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडीओ शूट करुन व्हायरल
नवी दिल्ली |
शाळेच्या इमारतीतच दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुख्य आरोपीसह आठ अल्वपयीन मुलांचा समावेश आहे. इतकंच नाही तर हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करुन व्हिडीओ ऑनलाइन शेअर करण्यात आला. हरियाणामध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीन आठवड्यांनी कुटुंबाला या घटनेची माहिती मिळाली अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली. नऊपैकी पाच आरोपी हे पीडित मुलीचे जवळचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी रेवारी जिल्ह्यातील गावात ही धक्कादायक घटना घडली. पाचवीत शिकणारी पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना तिचं अपहरण करण्यात आलं होतं. कुटुंबाने व्हिडीओ पाहिल्यानंतर ९ जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपींनी मुलीला शाळेतील रिकाम्या इमारतीत नेलं आणि बलात्कार केला. १८ वर्षीय मुलाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींनी तो फॉरवर्ड करुन व्हायरल केला”. आरोपींमधील पाच जण १० ते १२ वयोगटातील आहेत.