breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अण्णा हजारे पुन्हा सज्ज; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…

अहमदनगर : राज्यात सध्या विविध कारणांवर विरोधक आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय वाद शिगेला पोहोचला असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनीही लोकायुक्त कायद्यासाठी (Lokayukta Act) पुन्हा एकदा रान पेटविण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ‘अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय’, असा आरोप हजारे यांनी केला. (Anna Hazare has once again announced agitation for lokayukta act)

राज्यात लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले. राज्यातील ३५ जिल्हे आणि २०० तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या समित्या पुन्हा कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला. हजारे म्हणाले, ‘लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यावर बोलायलासुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. काय घडले? कोणी जादू केली? ठाकरे कसे बोलायचे बंद झाले? या विषयी मला माहिती नाही मात्र निश्चित काही तरी घडलंय,’ असेही हजारे म्हणाले.

पुढील आंदोलनाबद्दल हजारे म्हणाले, ‘एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असे आता आमचे आंदोलन असेल. राज्यात जिल्हास्तरावर बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातील ३५ जिल्हे आणि कमीत कमी दोनशे तालुक्यांत काम सुरू झाले. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी हे आंदोलन उभे केले जाणार आहे. आता लोकायुक्त कायदा झालाच पाहिजे, होणार नसले तर या सरकारने पायउतार व्हावे, अशी आमची मागणी आहे,’ असेही हजारे यांनी सांगितले. हजारे यांनी आंदोलनाची नेमकी तारीख अदयाप जाहीर केली नाही. मात्र, एकूणच महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हजारे पुन्हा सज्ज झाले असल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button