breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमुंबईराजकारणव्यापार

“आनंद महिंद्रांचा महाराष्ट्रातील लॉकडाऊन विरोध, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटल्या”

मुंबई |

राज्यात करोनाचा उद्रेक झाल्याने प्रसाराला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेतही दिले आहेत. मात्र, पुन्हा लॉकडाउन करण्याला आता विरोध होताना दिसत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. महिंद्रा यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मत मांडले असून, “पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज्यातील स्थिती आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर राऊतांनी टीकास्त्र डागलं असून, महिंद्रांच्या विरोधावरही भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधान सभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉक डाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे करोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही,” असं राऊत म्हणाले.

“करोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात लोकांना थाळ्या व टाळ्या पिटायला लावलं. पण त्यामुळे करोना गेला नाही. करोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. “पहिल्या लॉकडाऊनला वर्ष झालं. २४ मार्च २०२० च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेलं ते धक्कादायक आणि अमानुष होते. ‘हिंदुस्थान को बचाने के लिए, हिंदुस्थान के हर नागरिक को बचाने के लिए, आप सभी को बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात १२ बजे से घरों से बाहर निकलने पर पुरी तरह से पाबंदी है!’ ही घोषणा मोदींनी करताच संपूर्ण देशात हाहाकार माजला. स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं पलायन हिंदुस्थाननं याच काळात पाहिलं. देशभरात लोक अडकून पडले. ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन-दोन हजार किलोमीटर केला. त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले. पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच कोंडून घेतलं. कमाईचं साधन बुडाले. रोजगार संपला, पण भीतीनं त्या सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई १८ दिवस चालली. तुम्ही मला २१ दिवस द्या. २१ दिवसांत करोनाला हरवू, असं पंतप्रधान म्हणाले होते. आज एक वर्षानंतरही करोनाची लढाई व लॉकडाऊनची भीती कायम आहे,” अशी टीका राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.

वाचा- देश हादरला! १४ बेपत्ता जवानांचे सापडले मृतदेह; नक्षल्यांच्या घातक हल्ल्यात २२ जवान शहीद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button