प्रबोधनकार ठाकरे स्मृतिदिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांच्या साहित्याचे प्रदर्शन

मुंबई: संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, पत्रकार, थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार यांच्या ४९व्या स्मृतिदिनानिमित्त दादर (पूर्व) येथील शतकोत्तर रौप्य महोत्सवी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात त्यांच्या समग्र साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ग्रथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या हस्ते दिनांक २०नोव्हेंबरला करण्यात आले.
प्रबोधनकारांचे विचार हे वर्तमानातच नव्हे तर भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. विशेषत:सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून प्रश्नांकडे कसे पाहावे याची सम्यकदृष्टी वाचकांना लाभेल असे त्यांचे विचार आहेत.
या प्रदर्शनात त्यांचे ‘वक्तृत्वशास्र हे पहिले पुस्तक तसेच’धर्मांची देवळे’, देवळांचा धर्म’, ‘हिंदू धर्माचे दिव्य’ तसेच इतर पुस्तके ठेवण्यात आली आली असून साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले ग्रंथही या प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शन २६नोव्हेंबरपर्यंत सकाळी १०ते संध्याकाळी ७पर्यंत वाचकांना पाहता येईल असे संदर्भ कार्यवाह उमा नाबर यांनी सांगितले. या प्रदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने वाचक, अभ्यासकांनी घ्यावा असे आवाहन, संस्थेचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले आहे.

तसेच संदर्भ विभागात मराठीतील दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन दि २३ नोव्हेंबर पर्यंत सुरू रहाणार असून या प्रदर्शनात जुने म्हणजे१७९७चे ‘काॅम्पेडियन सिस्टिम आॅफ अॅस्ट्रानाॅमी’ हे मार्गारेट ब्राॅयन यांचे पुस्तक आहे. १८०३चे रुक्मिणीस्वयंवरपूर्वत्रक ,सिंहासनबत्तिशी हे मोडी लिपीतील १८१४चे,१८३४मधील भास्कराचार्य यांचे ‘सिद्धान्त शिरोमणी’अशी विविध १७९७ते१८६७या कालावधीतील शंभरच्यावर अती दुर्मीळ पुस्तके मांडण्यात आले असून हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अनमोल ठेवा आहे. संदर्भ विभाग कार्यवाह उमा नाबर यांच्या मार्गदर्शनात ,ग्रंथपाल मिताली तरळ व कर्मचारी यांनी उत्तमरीत्या याचे नियोजन केले आहे. या दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रदर्शनाला मराठी वाचक अभ्यासकांचा नेहमीप्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास कार्याध्यक्ष वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांनी व्यक्त केला.