AMPHAN चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, ओडिशा आणि बंगाल हाय अलर्टवर

नवी दिल्ली | हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशा इथे चक्रीवादळ ‘अम्फान’ चा इशारा दिला असून पुढील काही तासांत वादळ एक धोकादायक रूप धारण करू शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारपर्यंत पश्चिम बंगालमध्येही हे वादळ पोहोचू शकेल. आयएमडीने म्हटलेल्या निवेदनात, पश्चिम बंगालच्या उपसागरातून मध्य भागात गेल्या 6 तासांत तीव्र चक्रीवादळ ‘अम्फान’ ईशान्य दिशेकडे वाटचाल करत आहे.
ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे. हवामान खात्यानं येत्या 6 तासांत चक्रीवादळाचा भयानक प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘अम्फान’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता रविवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, ओडिशानं म्हटलं आहे की, या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या 11 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ते तयार आहेत.
एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी नवी दिल्लीत सांगितलं की, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, बंगालच्या उपसागरात ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर करत आहे आणि येत्या काही तासांत ते एका अत्यंत धोकादायक स्वरुपात असेल.