breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

अजितदादा, हीच मोडस ऑपरेंडी घातक; उपसभापती नीलम गोऱ्हेंसोबतच्या वादानंतर दरेकरांचं वक्तव्य

मुंबई । प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यासाठी आता थोडेच दिवस शिल्लक असताना गुरुवारी विधानपरिषदेत आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात वाद झाला. मुंबै बँक प्रकरणातील तक्रारदार धनंजय शिंदे यांच्या उल्लेखावरून या वादाला सुरुवात झाली. याच प्रकरणामुळे सध्या प्रवीण दरेकर (Pravin Darekar) अडचणीत आले आहेत. त्यांनी आपली व्यथा सभागृहात मांडली. त्यावेळी प्रवीण दरेकर यांनी धनंजय शिंदे यांना अप्रत्यक्षपणे बळ देणाऱ्यांना एकप्रकारे टोला लगावला. तक्रार करायला अक्कल लागत नाही. सभापतींना पत्र पाठवायचे, मग त्यांचा शेरा घ्यायचा आणि नंतर तक्रार करायची. त्यानंतर वर्तमानपत्रात बातम्या छापून आणायच्या. त्याआधारे पोलिसांत गुन्हा दाखल करायचा, हीच मोडस ऑपरेंडी सहकार चळवळीसाठी घातक असल्याची टिप्पणी प्रवीण दरेकर यांनी केली.
सहकारी संस्थांवर कारवाया करण्यापेक्षा त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीतील केवळ १० टक्के लोक वाईट आहेत. पण त्यामुळे संपूर्ण सहकार चळवळ अडचणीत येते. अनेकजण सहकारी संस्थांवर आरोप करतात. तक्रार करायला फार अक्कल लागत नाही. आरोप केल्यानंतर वर्तमानपत्रात बातमी छापून आणायची. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करायला लावायचा. पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केला की पुन्हा पेपरात बातमी छापून आणायची. अजितदादा, हीच मानसिकता आणि मोडस ऑपरेंडी सहकार चळवळीसाठी घातक ठरत आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. आरोपांमुळे संस्था अडचणीत येतात, मग त्या चालवणे अवघड होऊन बसते, असेही दरेकर यांनी म्हटले.

मुंबै बँक प्रकरणातील तक्रारदार धनंजय शिंदेही असाच प्रकार करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले. त्यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. तुम्ही सभागृहात तक्रारदाराचे नाव घेऊ शकत नाही. हे सभागृहाच्या संकेतांना धरून नाही, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले. त्यावर प्रवीण दरेकर यांनी असं कोण म्हणतं, कोणत्या नियमाप्रमाणे तक्रारदाराचं नाव घेऊ शकत नाही, असा सवाल केला. धनंजय शिंदे हे काही सभागृहाचे सदस्य नाहीत, असे दरेकर यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button