breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

अजितदादांचं भाषण झालं नाही, देवेंद्र फडणवीसच मास्टरमाईंड, आमदार सुनिल शेळकेंनी घटनाक्रमच सांगितला

पुणे : “देहूतील कालचा कार्यक्रम भाजप अध्यात्मिक आघाडीचा होता. त्या कार्यक्रमात वारकऱ्यांना कुठलंही स्थान दिलं गेलं नाही. दिखाव्यासाठी त्यांना मोदींच्या भाषणाला बसवलं गेलं, मात्र त्यांचा कुठलाही मान सन्मान ठेवला गेला नाही. प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण काल व्हायला हवं होतं. पण त्यांचं भाषण न होण्यामागे तसेच संपूर्ण प्रोटोकॉल बदलण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तेच यापाठीमागचे मास्टरमाईंड आहेत. त्यांच्या बरोबर तुषार भोसले यांनीही उपद्व्याप केले”, असा सनसनाटी आरोप मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते देहूतील तुकोबारायांच्या शिळा मंदिराचं उद्घाटन संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवलं गेलं. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं (देवेंद्र फडणवीस) भाषण झालं पण उपमुख्यमंत्र्यांनी भाषण न झाल्याने राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं गेलं. याच घटनेला राष्ट्रवादीचे नेते भाजपला जबाबदार धरुन टीकेचे झोड उठवत आहे. आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अध्यामिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर सनसनाटी आरोप केले. “व्यासपीठावर बसण्यापासून ते भाषणापर्यंत भाजप नेत्यांनी दुजाभाव केला. व्यासपीठावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तुषार भोसले, हभप कुऱ्हेकर महाराज आणि स्थानिक विश्वस्त मोरे महाराज यांनाच बसण्याची जागा दिली. पण लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार, खासदार, नगराध्यक्ष यांना कोणत्याही प्रकारची बसण्याची व्यवस्था केली नव्हती”, अशी खंत सुनील शेळके यांनी बोलून दाखवली.

“विश्वस्तांना आम्ही वारंवार विचारत होतो, की लोकप्रतिनिधी म्हणून आमची नावे प्रोटोकॉलमध्ये दिली का? तर त्यांनी देखील हो, दिली आहेत, असं उत्तर दिलं. मग प्रश्न उरतो, प्रोटोकॉल कुणी बदलला, पंतप्रधान एवढ्या छोट्या गोष्टीत लक्ष घालणार नाहीत. हा संपूर्ण प्रोटोकॉल बदलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि तुषार भोसले यांनी केलं”, असा आरोप सुनील शेळके यांनी केला. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झाल्यानंतर निवेदकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घ्यायला हवं होतं. पण त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांचं नाव पुकारलं. म्हणजेच सगळा कार्यक्रम नियोजनबद्ध होता. सकाळी मी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकासोबत बोललो, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, आजच्या कार्यक्रमात दादांना अधिकृतपणे बोलण्याची संधी दिली गेली नाहीये. याचाच अर्थ दादांना भाषण करु द्यायचं नाही हे आधीच ठरलं होतं”, असं सुनील शेळके म्हणाले.

देहूमध्ये नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारलं गेलं. यावेळी मोदींनीही अजितदादांना बोलू द्या, असा इशारा केला. पण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने ते भाषणासाठी डायसकडे गेले. अधोरेकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्यातल्या सरकारचे प्रतिनिधी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. पण असं असतानाही अजितदादांना बोलू न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button