ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित पवार यांचा राज ठाकरेंवर प्रहार

अहमदनगर | मशिदीवरचे लाऊड स्पीकर सरकारने काढले नाहीत, तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेत. त्यांच्या या आदेशावर पक्षातील नगरसेवक देखील नाराज आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हाच धागा पकडून राज ठाकरेंवर निशाणा साधला. “आरं बाबा बोलणं सोपंय, पण आपण काय सांगतोय, त्याचे काय परिणाम होतील, हे पण पाहिलं पाहिजे ना….”, असं अजितदादा म्हणाले. नगरमध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी अजितदादांनी आपल्या भाषणातील दोन-चार मिनिटे राज ठाकरेंवर सडकून प्रहार केले.

राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील आदेशामुळे पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत तर मुस्लिमबहुल प्रभागांचं नेतृत्व करणाऱ्या वसंत मोरे यांनी थेट राजादेश धुडकावून लावत, ‘मला माझ्या प्रभागात शांतता ठेवायची आहे’, असं म्हणत एकप्रकारे राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं. मनसे पक्षातूनच राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध होत असल्याचं पाहून आज अजित पवार यांनी भोंग्यावरुन राजकीय फटकेबाजी केली तसंच राज ठाकरे यांना लक्ष्य केलं.

“आरं भाषण करणं सोपंय बाबा, पण…”

“काही पक्षाचे नेते सांगतात, इथे असं करा, तिथे भोंगा लावा… आरं भाषण करणं सोपंय रं बाबा… आता त्यांच्याच पक्षातील नगरसेवक सांगायला लागले, आम्हाला इथे निवडून यायचंय. हे तुम्ही काय सांगताय… ही आज पुण्यात परिस्थिती आहे. समाजासमाजात ही दुही कशाकरिता..? याच्यातून आपण काय साधणार आहोत? देशाला आणि राज्याला आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत? आता कुठेतरी आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याची वेळ आली की नाही?”, असे एक ना अनेक सवाल अजित पवार यांनी राज ठाकरेंना विचारले.

मशिद, भोंगे, हनुमान चालिसा यावरती राजकारण करु पाहणाऱ्या राज ठाकरेंना बाकीचे प्रश्न नाहीत का, त्यावरती आंदोलन करा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. अशी भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे? कोरोना काळात तरुणांचा रोजगार गेला, अशी कृत्य करुन तो रोजगार परत मिळणार आहे का? असे सवाल अजित पवार यांनी विचारले.

“निवडणुकीवर डोळा ठेऊन, कुणाला तरी बरं वाटावं, म्हणून अशी भूमिका घ्यायची, बरं तुमचं वागणंही लोकांना चांगलं कळायला लागलंय. पण तुमची अशी भूमिका शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारी नाही, असंही अजित पवार यांनी निक्षून सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button