breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अहमदनगर: गुन्हे शाखेत नियुक्तीसाठी पोलिसांना द्यावी लागणार परीक्षा

अहमदनगर:पोलीस दलात सर्वाधिक महत्वाची आणि ‘मलाईदार’ शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळविण्यासाठी अधिकारीच नव्हे तर पोलीस अंमलदारही धडपडत असतात. अनेक ठिकाणी त्यासाठी वेगळेच निकषही ठरलेले असतात. नाशिक परीक्षेतील पाच जिल्ह्यांत मात्र आता वेगळा निकष लावण्यात येणार आहे. ज्यांना या शाखेत नियुक्ती हवी आहे, त्यांची गुन्हे शोध विषयक परीक्षा घेण्यात येणार आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांना यासंबंधीचा आदेश दिला आहे.

नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (एलसीबी) पोलीस अंमलदारांच्या मंजूर संख्याबळापेक्षा जास्त प्रमाणात पोलिस अंमलदारांची नियुक्ती झालेली आहे. त्यातील अनेकांना गुन्हे तपासाचा कोणताही अनुभव नाही. त्यांची पोलिस खात्यात पुरेशी सेवाही झालेली नाही. तरीही त्यांची या महत्वाच्या शाखेत नेमणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी हे परिपत्रक काढले आहे. अर्थात यासंबंधी पोलिस महासंचालकांनी पूर्वीच योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्या आधारेच हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

नाशिक परीक्षेत्रात आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती हवी असणाऱ्यांची गुन्हेशोधावर ७५ गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात ४० गुण वैकल्पिक (ऑब्जेक्टीव्ह) आणि ३५ गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा असेल. मेरीट लिस्टप्रमाणे एलसीबीत नेमणूक करण्यात येईल. त्याचा सविस्तर तपशील नाशिक कार्यालयास लेखी स्वरूपात दोन दिवसांच्या आत सादर करावा लागणार आहे. या परीक्षेसोबतच आणखी काही निकषही या पोलीस अंमलदारांना नियुक्ती देताना लावण्यात येणार आहेत.

– क्षमता, सचोटी आणि एकूणच योग्यतेचे व्यावसायिक निकष गुन्हेगारीच्या व अन्वेषणाच्या माहितीबाबत तपासण्यात येणार

– अधिकारी-कर्मचारी यांचे दहा वर्षांमध्ये अॅव्हरेज ग्रेडींग बी-प्लसच्या खाली नसावे.

– सेवा अखंडित असावी व त्यांच्याविरुद्ध कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी.
– कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा.

– गुन्हे अन्वेषण विद्यालयातून गुन्हे अन्वेषण करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
– कमीत कमी दोन पोलीस ठाणे येथे मिळून सहा वर्षे कर्तव्य केलेले असावे.

– स्वतंत्रपणे गुन्हे उघडकीस आणलेले असावेत.

– मागील दहा वर्षांत कोणतीही मोठी शिक्षा नसावी.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button