breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाल्यानंतर राजेश टोपेंनी मोदी सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई |

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण (Coronavirus Vaccination for Childrens in India) आजपासून सुरू झालं आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतील असं मत व्यक्त केलंय. तसेच टोपे यांनी यावेळेस आता केंद्राकडे १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केल्याचंही म्हटलंय.

आज जालन्यात टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर टोपे हे पत्रकारांशी बोलत होते. राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाउनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाउनबाबत राज्यांना समान निकष असायला हवे असंही टोपे म्हणाले. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची इच्छा होती पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे दवाखान्यात लसीकरण करण्यात येत आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गर्दी टाळावी असंही टोपे यांनी सांगितलं. कोरोना वाढत असल्यानं प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय सुविधेसाठी २३ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी राज्यांना दिला होता. यामध्ये केंद्राकडून निधी घेणाऱ्या राज्यांनी फक्त १७ टक्के किंवा त्याहूनही कमी निधी राज्यांनी वापरला असा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलाय. यावर बोलताना टोपे यांनी, “खर्च कसाही करून चालत नाही. त्याचं नियोजन करावं लागतं. हा निधी खर्च करण्यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले.

लॉकडाउनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचं ते म्हणाले. शाळेमध्ये लसीकरण करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही टोपे यांनी सांगितलं आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

  • लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, राज्यात १५-१८ वर्ष वयोगटातील सुमारे साठ लाखांवर मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत. राज्यभरातील ६५० केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण होणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लशीच्या वापराला परवानगी असल्याने मुलांसाठीच्या लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी असेही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कळवल्याचे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button