breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“निकालांनंतर माझ्या बापाची आठवण येईल”, सांगलीत आर. आर. आबा पाटलांच्या मुलाचा विरोधकांना इशारा!

मुंबई |

राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्ष जोरकसपणे प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आपल्या सभांमधून रोहित पाटील विरोधकांवर परखड शब्दांमध्ये टीका करताना दिसत आहेत. त्यासोबतच, विरोधकांना जाहीरपणे आव्हान देताना सत्ताकाळात तुम्ही काय केलं? असा सवाल देखील विचारताना दिसत आहेत. त्यांच्या विधानांची आणि आक्रमक भाषणांची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पाटील यांनी जाहीर सभेमध्ये विरोधकांना इशारा दिला होता. “आपण सगळ्यांनी सांगितलं की २५ वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत. पण आता माझं वय २३ आहे आणि २५ होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही याची खात्री देतो”, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या अजून एका भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

  • “आदर्श घोटाळा ऐकला होता, आता..”

कवठे महांकाळमध्ये रविवारी झालेल्या एका सभेमध्ये रोहित पाटील यांनी विरोधकांवर परखड शब्दांत निशाणा साधला. “आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष नगरपंचायतीची निवडणूक आजही आहे. रस्ते, पाणी, गटारी, घरकुल अशा सर्व कामांवर लढवतोय. दुर्दैवी गोष्ट आहे. १५ वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, नगरपंचायत होती, आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं सांगतायत..आदर्श घोटाळा ऐकला होता”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

  • “जी लोकं संडासमध्येही पैसे…”

दरम्यान, विरोधकांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी खोचक शब्दांत टीका देखील केली आहे. “आदर्श नगरपंचायत काय असते, हेसुद्धा तुम्हाला सांगतो. जी लोकं संडासमध्ये सुद्धा पैसे खाऊ शकतात, त्या लोकांची वृत्तीसुद्धा तिथे बसण्याचीच असू शकते असं मला वाटतं”, असं रोहित पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी विरोधकांना दिवंगत आर. आर. पाटील यांची आठवण देखील करून दिली. “आज राष्ट्रवादी पक्षाला इथल्या सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलंय. १९ तारखेला निकाल आल्यानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले. २१ तारखेला आणि पुढील महिन्यात १८ तारखेला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार असून १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

  • विरोधकांना आव्हान…

“विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायचीये किंवा जे मला सल्ले देतायत त्यांनी या निवडणुकीत शहरात काय प्रलंबित विकासकामं राहिली आहेत यावर माझ्यासमोर यावं आणि सांगावं. बघुयात कोण सांगतंय किती विकास झालाय आणि किती विकास झाला पाहिजे”, असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button