लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांना कमळ चिन्हावर लढावे लागेल : आमदार रोहित पवार
महायुतीमध्ये खिचडी झाल्याचा टोला : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शक्तीप्रदर्शन

पिंपरी: पलीकडे खिचडी झाली आहे. कोणाला कुठे उमेदवारी मिळेल याचा गोंधळ आहे. तिकडे उमेदवारी बाबतचा संघर्ष आतापासूनच सुरू झाला आहे असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला लगावला. “थोडे दिवस थांबा फक्त लोकसभा होऊ द्या, लोकसभा निवडणुकीनंतर इकडून गेलेल्या अनेक नेत्यांना कमळ चिन्हावर लढावे लागेल असे देखील रोहित पवार यावेळी म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरात दौऱ्यानिमित्त आलेल्या आमदार रोहित पवार यांनी कासारवाडी येथे पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, माधव पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी रोहित पवार म्हणाले आजही पिंपरी चिंचवड येथील नागरिक शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हा संभ्रम निर्माण व्हायचे कारण नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा साहेबांनी चालवला तोच पुढे नेण्यासाठी आम्ही शरद पवार यांना साथ देणार आहोत. केवळ चार लोक पलीकडे गेले म्हणून पक्ष संपला असे होत नाही. आमची विचारांची लढाई आम्ही शरद पवार यांच्या सोबतीने लढणार आहोत. भाजप विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत असे देखील रोहित पवार यावेळी म्हणाले. पलीकडे प्रचंड संभ्रम आहे.हे लोकसभेनंतर स्पष्ट होणारच आहे. लोकसभेनंतर अनेक नेत्यांना कमळ चिन्हावर लढावे लागणार आहे ही वस्तुस्थिती काही दिवसात स्पष्ट होईल असे देखील पवार यावेळी म्हणाले.
विशेष अधिवेशन घेण्यामागचे प्रयोजन काय
लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. कदाचित भाजप डिसेंबर महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका घेऊ शकते . अन्यथा सामान्य लोक अडचणीत असताना लोकसभेचे विशेष अधिवेशन घेण्यामागचे प्रयोजन काय असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
….म्हणून शहरातील सत्ता गेली
पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्वी एका नेत्याच्या पाठीमागे चार पाच लोक असायचे, हेच कोणाला नगरसेवक करायचे ते ठरवायचे, त्यांच्यामुळे शहरात पक्ष वाढला नाही. या “लोकल” नेत्यांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेतील सत्ता गेली. त्यामुळे तिकडे गेले ते बरे झाले.तिकडे गेलेले अनेकजण संपर्कात असून लवकरच परत येतील असेही रोहित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांना मानणारे अनेक जुने जाणते नेते आहेत. त्यामुळे या शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीची घडी बसवण्यासाठी
संघटना म्हणून खूप मोठी ताकद लावणार आहे. भाजपच्या सत्ता काळात गेल्या पाच वर्षात कोणती मोठी विकास कामे झाली आहेत. पालिकेतील ७० टक्के कामे गुजरातच्या कंपनीला दिल्याचे दिसते.
शहरात नियोजन नाही
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये नियोजन नाही. अमृत योजनेमध्ये दीडशे कोटींचा खर्च करण्यात आला. नसबंदी सारख्या योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे. या योजनेच्या खर्चाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत. फुटपाथवर सातत्याने खर्च केला. एकाच कामावर सातत्याने निधी गेला आहे. कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. डेंग्यूची साथ पसरली आहे. चोवीस तास पाणी देण्याचे भाजपचे आश्वासन पूर्ण झाले नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घरे मिळाली नाहीत. महापालिका निवडणुका जाणीवपूर्वक लांबविण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित ठेवून प्रशासकीय राजवट एक प्रकारे भाजपने नागरिकांवर थोपविली आहे. ज्यामुळे काही ठराविक पदाधिकाऱ्यांची कामे महापालिकेत होतात. त्यामुळे विकास खुंटला आहे. सर्विस रोड, टाऊन प्लॅनिंग मधील बरेचशे रस्ते अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे शहरात वारंवार काही ठराविक भागात वाहतूक कोंडी होते.