breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

नवी मुंबईत शिवसेनेनंतर आता एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला देणार दणका?

नवी मुंबई :एकनाथ शिंदे यांनी अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना पक्ष फोडून शिवसेनेवरच दावा सांगितलाय. शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांच्या मजबूत पाठिंब्यावर आणि देवेंद्र फडणवीसांच्या साथीने भाजप-शिंदे गटाची गाडी सध्या सुस्साट आहे. मुख्यमंत्रिपद शिंदेंकडे असल्याने त्यांच्या गटात येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील ६ माजी नगरसेवक (सध्या कार्यकाळ संपल्याने माजी नगरसेवक) अजितदादांना धक्का देऊन लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगते आहे. महापालिका निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना माजी नगरसेवकांनी अजितदादांची साथ सोडणं राष्ट्रवादीसाठी निश्चितच मोठा धक्का असेल.

गणेश नाईक हे एकेकाळचं राष्ट्रवादी पक्षातलं मोठं नाव. त्यांच्या नावाशिवाय नवी मुंबईत पानही हलत नव्हतं, हे अजूनही सगळेच मान्य करतात. गणेश नाईकांनी ठरवायचं आणि नवी मुंबई राष्ट्रवादीतल्या नगरसेवकांनी ऐकायचं, हा अलिखित नियम होता. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईकांनी वाऱ्याची दिशा पाहून राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीसांना साथ देण्याचा निर्धार करुन भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीसाठी तो खूप मोठा धक्का होता. नंतरच्या काळात गणेश नाईक समर्थक नगरसेवकांनी एकएक करुन राष्ट्रवादीची साथ सोडली. गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांचं भाजपमध्ये जाणं, हा अजित पवार यांच्यासाठी निश्चित मोठा दणका होता. त्यानंतर अजित पवार यांनी पक्षबांधणीचं काम हाती घेतलं, नवी मुंबईत लक्ष घालायला सुरुवात केली. नवी मुंबईत पक्षाला नवी पालवी फुटेल असं वाटत असतानाच आता पुन्हा राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल अर्धा डझन माजी नगरसेवक राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावरुन काढण्याच्या तयारीत आहेत. हे सगळे माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असून येत्या काळात राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याचे सांगितले जाते.

अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गणेश नाईक यांचा दबदबा होता. पक्ष कोणताही असो गणेश नाईकांनी आपला दबदबा कायम टिकवून ठेवला. नाईकांनी शिवसेना सोडण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी शिवसेनेसाठी तो धक्का होता, तसंच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतानाही झालं. पक्ष सोडताना नाईक एकटे पक्ष सोडत नाही तर त्यांच्याबरोबर काही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नाईकांना साथ देतात. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होतं. तीन वर्षापूर्वी गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. आता त्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत असताना पुन्हा अर्धा डझन माजी नगरसेवकांनी अजितदादांचं टेन्शन वाढवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button