ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कौतुकास्पद! वाहतूक पोलिसांनी श्रमदानातून बुजविले महामार्गावरील खड्डे!

पिंपरी चिंचवड | वाहन चालकांना अडविणे, कागदपत्रांची तपासणी करणारे किंवा केवळ दंडात्मक कारवाईवर भर देणारे वाहतूक पोलीस आपण नेहमी पाहतो. वाहनचालकांना कारवाईचा धाक दाखवून त्यांच्यांकडून पैसे उकळणारे पोलीस अशीच प्रतिमा वाहनचालकांकडून या पोलिसांची झालेली ऐकायला मिळते.मात्र, या पलीकडे जाऊन वाहतूक कोंडी टाळावी, अपघात घडून कुणी जखमी होऊ नये याभावनेतून स्वतः श्रमदान करून महामार्गावरील खड्डे बुजिण्याचे काम देहूरोडच्या वाहतूक पोलिसांनी केले. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत वाहतूक पोलीस निरीक्षकांडून त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर देहूरोड रेल्वे पुलावर खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडू लागल्या होत्या. या ठिकाणी रेल्वे पुलाच्या उभारणीचे काम सुरु झाल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. नेमक्या पुलावरच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये वाढ होऊ लागली. या पार्श्वभूमीवर पुलाजवळ कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस कुर्मदास दहिफळे आणि प्रफुल्ल पाटील या दोन्ही कर्मचाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून महामार्गावरील खड्डे बुजविले. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला. शिवाय वाहतूक कोंडीही काहीशी कमी झाली.

सोशल मीडियावर होतेय कौतुक

वाहतूक पोलिसांच्या या श्रमदानाचे फोटो माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशन यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे पोलिसांच्या या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. दरम्यान देहूरोड -तळेगाव वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि उपनिरीक्षक किशोर यादव यांनी दहिफळे आणि पाटील या कर्मचाऱ्यांचा नुकताच सन्मान करून त्यांचे कौतुक केले.

कर्मचाऱ्यांना पदक देऊन सन्मानित करा : रमेशन

वाहतूक पोलीस कायम टीकेचे धनी असतात. मात्र, ऊन पाऊस थंडी अशा काळातही रस्त्यावर उभे राहून ते आपले कर्तव्य बजावत असतात. अशा वेळी केवळ कारवाई न करता वाहनचालकांची सुरक्षा हे कर्तव्य समजून रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्याचे काम करणाऱ्या दहिफळे आणि पाटील या दोन्ही कर्मचाऱ्यांना पदक देऊन सन्मानित करावे, अशी मागणी रमेशन यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

युवा सेनेचे उपतालुका अधिकारी विशाल दांगट म्हणाले, वाहतूक पोलिसांनी श्रमदानातून खड्डे बुजवून चांगल्या कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. शिवाय पोलीस दलाची शान वाढविण्याचे काम केले आहे. युवासेनेच्या माध्यमातून त्यांचा लवकरच यथोचित गौरव केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button