breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कौतुकास्पद! सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिला चालकाकडे; सतेज पाटील म्हणाले…

मुंबई |

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्याच्या विकासकामांना दिलेल्या निधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते. मात्र या दौऱ्यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीच्या चालकाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलीस दलातील महिला चालकाने केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तृप्ती मुळीक या चालकाच्या जागी बसलेल्या दिसत आहेत. तर गाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे दिसत आहे.

राज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा फोटो फेसबुकवर पोस्ट करत तृप्ती मुळीक यांचे कौतुक केले आहे. “नारी शक्ती! कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत आणि मी बसलेल्या गाडीचे सारथ्य केले. गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत. २३ डिसेंबर, २०२१ रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता,” असे सतेज पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/SatejPatil/posts/448590459970684

“त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!,” असेही सतेज पाटील म्हणाले. दरम्यान, कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग येथे बैठकीसाठी आले असताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button