breaking-newsTOP NewsUncategorizedपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

प्रशासक शेखर सिंह यांची इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट

नियंत्रण आणि कमांडिंगद्वारे डेटा, सेन्सर्स आणि ऍप्लिकेशन्सची घेतली माहिती

पिंपरी। महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल (ICCC) सेंटरला प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी भेट देवून संपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली. तसेच, केंद्र शासनाने दिलेल्या कालावधीत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेचा पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अस्तिस्त मॉल, निगडी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरला दि. १० रोजी प्रथमच भेट दिली. यावेळी संपूर्ण इमारत व परिसराची देखील पाहणी केली. याप्रसंगी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता संजय खाबडे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे यांच्यासह प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

कमांड आणि कंट्रोल सेंटर हे आपत्तींचे व्यवस्थापन, शहरातील विविध ऑपरेशन्ससाठीचे केंद्र आहे. सदर प्रकल्प “अ” क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आला आहे. आयसीटीच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिक केंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले, त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये ऑप्टीकल फायबर, वाय फाय, वायर्ड बस, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, लॉंग टर्म इव्होल्युशन नेटवर्क उभारण्यात येत आहे. कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या साहाय्याने स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट समुदायांचे व्यवस्थापन, स्मार्ट महानगरपालिका व्यवस्थापन, स्मार्ट परिवहन व्यवस्थापन इत्यादी घटकांशी संपर्क स्थापित करून त्यांचे मूल्यमापन करणे शक्य असून संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जाणार आहे.

डॅशबोर्डच्या माध्यमातून आयसीसीसीमधील प्रत्येक घटकाच्या सद्यस्थितीबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेता येणार आहे. सोबतच, ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणारी कामे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे, विविध संस्थांबरोबर एकत्र काम करणे, समस्या शोधणे व त्यांची निराकरण, माहितीचे रिअल टाईम विश्लेषण आणि भविष्यवेधी बौद्धिक कौशल्य, जनजागृती आणि प्रतिसाद या कार्यपद्धतीद्वारे लोकांचा सहभाग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थेपर्यंत सुलभतेने पोहोचता येईल. योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण आणि देखरेख, सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणी द्वारे नागरिकांच्या वर्तनामध्ये बदल, शहराचा आत्मनिर्भर आणि बहुआयामी विकास करणे शक्य होणार असल्याचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button