breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

लसीच्या कच्च्या मालासाठी अदर पुनावालांची थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना विनंती

मुंबई – देशात लसीकरणाला वेग येताच लसींचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनीही याबाबत माहिती दिली होती. कोरोनाच्या लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका बाहेर पाठवत नसल्याचं अदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ट्विटरद्वारे मागणी केली आहे.

अदर पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “आदरणीय जो बायडेन…जर आपण खरंच करोना व्हायरसविरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे”.

“शक्य असतं, तर मीच अमेरिकेत आंदोलन केलं असतं”
अदर पुनावाला यांनी याआधीही कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं होतं. यावेळी त्यांनी शक्य असतं तर मीच अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं असतं असं म्हटलं होतं. “मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नाही, तर जगभरातील करोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक आहे”, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं होतं.

“आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. सहा महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे”, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं होतं.

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यावेळी बोलून दाखवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button