विनातिकीट प्रवास करणा-या एक लाख 37 हजार प्रवाशांवर कारवाई
पिंपरी l प्रतिनिधी
पुणे रेल्वे विभागात विनातिकीट प्रवास करणा-या एक लाख 37 हजार प्रवाशांवर रेल्वे विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून रेल्वेने सहा कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुणे रेल्वे विभागाची विविध प्रकारची कारवाई सातत्याने सुरु आहे. एक एप्रिल 2021ते पाच जानेवारी 2022 या कालावधीत पुणे रेल्वे विभागात तब्बल एक लाख 37 हजार विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांना पकडण्यात आले. या प्रवाशांकडून सहा कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तिकीट चेकिंगसाठी सहा कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. मागील तीन महिन्यांपूर्वीच हे लक्ष्य पुणे विभागाने पूर्ण केले आहे.
विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एस वी एन सुभाष यांच्या नेतृत्वात तिकीट तपासणी निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा विभागाने ही कारवाई मोहीम केली आहे.
प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर प्रवेश आणि प्रवास करावा. विनातिकीट प्रवास केल्यास 250 रुपये दंड घेण्यात येईल. सध्या कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवासाला मुभा आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवासाला निघावे. कन्फर्म तिकीट नसताना प्रवास करताना आढळून आल्यास अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे.
प्रवासात निश्चित वजनापेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन जात असताना त्याचे देखील तिकीट घ्यावे. अन्यथा सहापट दंड वसूल करण्यात येईल. लगेज बुक करण्याची सुविधा सर्व रेल्वे स्थानकांवर आहे. नागरिकांनी रेल्वेच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे रेल्वे मंडळाकडून करण्यात आले आहे.