TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

प्रलंबित विकासकामांना गती द्या – आमदार सुनील शेळके

पुणे | मावळ तालुक्यातील मंजूर झालेल्या कामांपैकी सुमारे 60 टक्के कामे अजूनही प्रलंबित आहेत. जनसामान्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध असतानाही विकासकामे प्रलंबित का आहेत, त्या कामांना गती द्या, अशा सुचना आमदार शेळके यांनी दिल्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबाबत गुरुवारी (दि.9) पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक झाली. बांधकाम,पाणीपुरवठा,आरोग्य आदी विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत या बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, पंचायत समिती सभापती ज्योतीताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या अलकाताई धानिवले, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, निकिताताई घोटकुले, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. काही कामांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागनिहाय माहिती घेत प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी समयसीमा (डेडलाईन) निर्धारित करून दिली. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध आहे.अनेक कामे मंजूर आहेत. मंजूर कामांपैकी काही कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.परंतु सरासरी 60 टक्के कामे अजूनही अधांतरीच आहेत. ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गतीने काम करण्याची गरज आहे.

स्मशानभूमीसाठी गायरान जागा असल्याचे कारणामुळे अनेक गावातील स्मशानभूमीची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर योग्य पर्याय काढणे गरजेचे असून यावर कार्यवाही व्हावी.

घरकुल योजनेतील लाभार्थींना जागा उपलब्ध होत नसल्यामुळे योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यासाठी कुठे जागा उपलब्ध होईल यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधायला हवा. प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावावीत.
तालुक्यात 25 पेक्षा अधिक ठिकाणी अंगणवाड्यांची दुरावस्था झाली आहे. त्याठिकाणी चांगल्या दर्जाच्या अंगणवाड्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची तरतूद पाहून लवकरात लवकर ही कामे हाती घ्यावीत. जल जीवन मिशन अंतर्गत अजूनही 53 गावांचा आराखडा सादर करण्यात आला नाही. त्यासाठी संबंधित अधिकारी यांनी लवकर पावले उचलावीत, अशा सूचना आमदार शेळके यांनी केल्या.

दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहेत. परंतु त्यासाठी या निधीचा हवा तेवढा विनीयोग केलेला नाही. या योजना प्रभावीपणे राबवून योग्य लाभार्थींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी जनजागृती करावी व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.

महिलांचे बचत गट करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना आहेत.परंतु त्यासाठी गावपातळीवर काम करावे. ग्रामसंघ स्थापन केले पाहिजे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत,असे आग्रही मत आमदार शेळके यांनी यावेळी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button