breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

एका आठवड्यानंतर तिथे गाडीच नव्हती असे म्हणतील आणि त्यानंतर..; लखीमपूर प्रकरणावरून केजरीवालांचा मोदींवर निशाणा

उत्तर प्रदेश |

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद मंगळवारीही उमटले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. दुसरीकडे, सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या कॉंगे्रस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी भाष्य करत मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधानजी एका गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचे सर्वांनी पाहिले आहे. ज्याप्रकारे सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यातून काय संदेश द्यायचा आहे? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. “आरोपींनी दिवसाढवळ्या मोठ्या गर्दीसमोर शेतकऱ्यांना आपल्या गाडीने चिरडले. तरीही आरोपींना अटक झालेली नाही. त्यांना का वाचवले जात आहे. सर्वांसमोर एवढ्या शेतकऱ्यांना आरोपी चिरडून जात असेल आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर असे फक्त हिंदी चित्रपटांमध्येच पाहायला मिळतं,” असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

“एकीकडे सरकार स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना लखीमपूर खेरीला येण्यापासून रोखले जात आहे. असे तर इंग्रज करायचे. यासाठीच का आपल्या पूर्वजांनी आंदोलन केले होते. आपले बलिदान दिले होते. तिथे काय आहे जे लपवले जात आहे. असं काय झालंय की तिथे पत्रकार, शेतकरी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना तिथे जाऊ दिले जात नाही. आज सर्व भारताला जाणून घ्यायचं आहे की, लखीमपूरमध्ये काय झालं होतं? कोणी गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातली? सत्य जाणून घेणे हा देशातील लोकांचा अधिकार आहे ना?,” असा सवाल केजरीवालांनी केला आहे. “गेल्या एका वर्षापासून शेतकरी सीमेवर आपल्या मागण्या घेऊन बसले आहेत. तिथे ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जीव गेला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली जाते, त्यांना चिरडून मारून टाकले जाते. शेतकऱ्यांविरुद्ध एवढा द्वेष का? आज व्यवस्थेतील लोक बोलत आहेत की त्या गाडीमध्ये मंत्र्याचा मुलगा नव्हता. एक आठवड्यानंतर संपूर्ण व्यवस्था म्हणेल तिथे गाडीच नव्हती आणि एका आठवड्यानंतर संपूर्ण व्यवस्था म्हणेल तिथे शेतकरीच नव्हते. सत्य हेच आहे की इथे फक्त न्याय मिळत नाही. आज देशातील प्रत्येक नागरिक न्यायाची मागणी करत आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. पंतप्रधान मोदीजी सर्व देशाला वाटतंय की ज्या लोकांवर हत्येचा आरोप आहे त्यांना तातडीने अटक करायला हवी. संबधित मंत्र्याला तुम्ही मंत्रीमंडळातून काढून टाका,” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button