Mahaenews

जबरदस्त वेगात धावणाऱ्या मंत्र्याच्या एसयुव्हीने शेतकऱ्यांना चिरडलं; लखीमपूर खेरीचा नवा व्हिडीओ आला समोर

A new video of Lakhimpur Kheri was released

जबरदस्त वेगात धावणाऱ्या मंत्र्याच्या एसयुव्हीने शेतकऱ्यांना चिरडलं; लखीमपूर खेरीचा नवा व्हिडीओ आला समोर

Share On

नवी दिल्ली |

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारामुळे सध्या देशात मोठ्या प्रमाणात तणाव असून अनेक ठिकाणी उद्रेक पहायला मिळत आहे. विरोधकांकडून याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक केल्याची मागणी केली जात असताना अजय मिश्रा मात्र आपला मुलगा त्यात सहभागी नव्हता असं सांगत आहेत. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना अजय मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. दरम्यान याप्रकरणी अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यातच या घटनेचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगाने धावत असून निशस्त्र असणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. यानंतर विऱोधकांकडून घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अजय मिश्रा यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे गाडीवर दगड, विटांचा हल्ला होताना दिसत नाही. याउलट चालकाकडे गाडीता ताबा असून अत्यंत वेगात पळवत त्याने शेतकऱ्यांना चिरडल्याचं दिसत आहे.

याआधी काँग्रेससह इतर नेत्यांनी घटनेचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेद्र मोदींसह भाजपावर निशाणा साधला होता.

Exit mobile version