ताज्या घडामोडीमुंबई

पत्नीला मारल्याच्या आरोपातून १३ वर्षांनी मुक्त, एका मजुराचे अपिल मान्य

 मुंबई |  प्रतिनिधी

 पत्नीच्या अंगावर केरोसिन टाकून तिला जाळून ठार केल्याच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पुण्यातील एका मजुराचे अपिल मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा नुकतीच रद्द केली. यामुळे १३ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पतीची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सतीश काळे असे या निर्दोष सुटलेल्या पतीचे नाव आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या सतीशची बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने अॅड. आशिष सातपुते यांची नेमणूक केली होती. सतीशची पत्नी मनीषा हिचा मृत्यूपूर्वी नोंदवलेला जबाबच विसंगत असल्याचा प्रभावी युक्तिवाद सातपुते यांनी न्या. साधना जाधव व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर मांडला. तर पत्नीचा मृत्यूपूर्वीचा जबाब गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसा असल्याने पुणे सत्र न्यायालयाने सतीशला ३१ जानेवारी २०१३ रोजी ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा योग्यच आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मांडला. मात्र, ‘पत्नीचा मृत्यूपूर्वीचा जबाब हा सुस्पष्ट व नि:संदिग्ध नाही आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला जाण्यापूर्वी तिने रुग्णालयातील डॉक्टरांना आपण अपघाताने भाजल्याचे सांगितले होते. डॉक्टरांकडे दिलेला जबाबही एकप्रकारे मृत्यूपूर्वीच्या जबाबासारखा असतो. अशा प्रकरणांत मृत्यूपूर्वीच्या जबाबात कोणत्याही प्रकारची विसंगती असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यांत स्पष्ट केलेले आहे. मनीषाला रुग्णालयात दाखल करणाऱ्या भापकर नावाच्या व्यक्तीची साक्षही सरकारी पक्षाने न्यायालयात नोंदवली नाही. या सर्व बाबींकडे पुणे न्यायालयाने निर्णय देताना दुर्लक्ष केल्याचे दिसते. परिणामी अपिलकर्त्याविरोधातील (सतीश) आरोप निर्विवादपणे सिद्ध होत नसल्याने आम्हाला त्याच्या बाजूने निर्णय देणे भाग आहे,’ असे खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले.

‘सतीशला दारूचे व्यसन होते आणि दारूसाठी पैसे मिळावे म्हणून तो मनीषाला मारझोड करत असे. एकेदिवशी तिने पैसे देण्यास नकार दिल्याने सतीशने तिच्या अंगावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिले आणि तो घराबाहेर पळून गेला. मनीषाने आरडाओरड करत मदत मागितल्यानंतर जवळच राहणाऱ्या सतीशच्या बहिणीने तिच्या अंगावर ब्लँकेट गुंडाळून आग विझवली. तेव्हा, मदतीला येण्याचे नाटक सतीशने केले. त्यानंतर मनीषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला’, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. मात्र, ‘मृत्यूपूर्वीचा जबाब हा प्रत्यक्षात न्यायदंडाधिकाऱ्यांऐवजी पोलिसांनीच नोंदवला. तत्पूर्वी डॉक्टरांशी बोलताना तिने आपण अपघाताने भाजल्याचे म्हटले होते. तिच्या हाताची बोटे भाजली होती आणि त्यामुळे नोंदवलेल्या जबाबावर अंगठा वठवण्याची स्थितीत ती नसावी. तरीही तिच्या अंगठ्याचा ठसा दाखवण्यात आला आहे. या साऱ्यामुळे मृत्यूपूर्वीचा जबाब संशयास्पद आहे’, असा युक्तिवाद सातपुते यांनी मांडला. तो खंडापीठाने ग्राह्य धरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button