भायखळ्यातील मदनपुरा भागात लेदरच्या गोदामाला भीषण आग
मुंबई | प्रतिनिधी
भायखळ्यातील गजबजलेले ठिकाण समजल्या जाणाऱ्या मदनपुरा येथे एका गोदामाला भीषण स्वरूपाची आग लागल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. ही आग तब्बल चार तास झुंज देऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
भायखळ्यातील मदनपुरा येथील तस्लिमा हाईट या बिल्डिंगजवळ तळ मजला अधिक एक असे दुमजली लेदरचे गोदाम आहे. या गोदामाला बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामातील लेदरच्या साठ्यामुळे आग आणखी भडकली. आग लागलेल्या गोडाऊनच्या बाजूला अनेक बैठी बांधकामे आहेत. आजूबाजूला आग पसरण्याची भीती असल्याने सायंकाळी ७.५० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाने आग लेव्हल २ ची झाल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल ४ तास आगीशी झुंज दिल्यानंतर रात्री ११.१५च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या आगीमुळे कोणीही जखमी झाले नाही. मात्र गोडाऊन जळून मोठी वित्त हानी झाली. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.