breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकावर आदळून मासेमारी नौकेला जलसमाधी; खलाशी बचावले

रत्नागिरी |

धुक्यामुळे जलमार्गातील खडकाचा अंदाज न आल्याने त्यावर आदळून रत्नागिरीतील मासेमारी नौकेला विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) मध्ये जलसमाधी मिळाली. मात्र खलाशांनी प्रसंगावधान दाखवत डिंगीचा (लहान नौका) आसरा घेतला. तेथून सहकाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावून घेतल्याने नौकेवरील २४ खलाशी सुखरुप आहेत. यामध्ये नौकेचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मिरकरवाडा येतील शौकत दर्वे यांच्या मालकीची ही नौका मासेमारी करून मंगळवारी पहाटे बंदराकडे परतत होती. पण धुके असल्याने विजयदुर्ग येथील जलमार्गामध्ये असलेल्या खडकाचा तांडेलला अंदाज आला नाही.

वेगात असलेली नौका या खडकावर आदळल्याने पुढील काही भाग फुटला आणि समुद्राचे पाणी नौकेमध्ये शिरू लागले. या वेळी नौकेवर असलेल्या २४ खलाशांनी पाणी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. पाणी भरुन नौका बुडणार, असा अंदाज आल्यामुळे सोबत असलेल्या डिंगीत सर्वजण बसले आणि त्यांनी मदतीसाठी इतर सहकाऱ्यांना फोन केले. त्यांच्या डोळ्यासमोर नौकेमध्ये पाणी शिरून ती बुडत होती. काही वेळाने मदतीसाठी दुसरी नौका आली. त्यांनी डिंगीत असलेल्या २४ खलाशांना नौकेवर घेऊन त्यांची या संकटातून सुटका केली. सर्व खलाशी सुखरुप आहेत. मात्र नौकेला जलसमाधी मिळाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य नौकांच्या मदतीने ही नौका बाहेर ओढून किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला तशी खबर देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button