breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होणार!

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश

धिकाऱ्यांनी लोके यांच्या घरी जात स्वतःच जबाब लिहित  त्यावर कोरोना विलगीकरणात असलेल्या मुलाची  सही घेतली

पिंपरी । प्रतिनिधी

उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे बिल दिले नसल्याने तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल  कॉलेजने  तीन दिवस मृतदेह  ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवला होता. संबंधितांनी महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी अर्ज केला असतानाही मृतदेह देण्यास नकार दिला. बिलांसाठी तीन दिवस मृतदेह ठेवणे, नातेवाईकांची पिळवणूक करणे अतिशय संतापजनक आणि चुकीचे आहे. याप्रकरणी मायमर  मेडिकल कॉलेज व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.
तसेच आज आढावा बैठक असल्याने महसूलचे अधिकारी काल मृत लोके यांचा मुलगा सुधीरकडे गेले. अधिकाऱ्यांनी स्वतःच जबाब लिहिला आणि विलगीकरणात असतानाही त्याची सही घेतली. या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी खासदार बारणे यांनी केली.
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात झाली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे मायमर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेला प्रकार बैठकीत सांगितला. तीन दिवस एखादा मृतदेह अंत्यविधी न करता ठेवता येतो का, असे विचारताच प्रशासनाने मृतदेह ठेवता येत नसल्याचे स्पष्ट केले.  काही कारणाने मृतदेह ठेवणार असाल तर ज्या दिवशी मृत्यू झाला आहे.  त्याच दिवशी त्याची खबर दिली पाहिजे, असे प्रशासनाने सांगितले.
त्यावर खासदार बारणे म्हणाले, मायमर कॉलेजमध्ये मळवलीतील गणेश लोके या रुग्णाचा उपचारादरम्यान 1 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या कुटूंबियांकडे बिल  देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे कॉलेजने तीन दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला होता. हा प्रकार समजल्यानंतर मी  स्वतः 3 मे ला कॉलेजमध्ये  गेलो.
कॉलेजच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे या  माझ्यासमोर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मुलाशी अरेरावी करत होत्या, उद्धटपणे बोलत होत्या. त्या मुलाने राज्य सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी अर्ज केला होता. त्याला 50 हजार रुपये मंजूर होणार होते. देय बिल  पण तेवढेच होते. असे असतानाही मृतदेह देण्यास नकार दिला होता, अशी सर्व हकीकत खासदार बारणे यांनी सांगत कॉलेज व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर असे घडले असेल तर संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश पालकमंत्री पवार यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी घरी जाऊन स्वतःच जबाब लिहून त्यावर कोरोना पॉझिटिव्ह मुलाची घेतली सही !
कोरोना आढावा बैठक आज होती. म्हणून कालच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृत गणेश लोके यांचा मुलगा सुधीरचा जबाब घेण्यास  सांगितले. आज बैठक असल्याने तातडीने कालच जबाब घेतला. सुधीरच्या कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. असे असतानाही महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी सुधीरकडे गेले. अधिकाऱ्यांनीच जबाब लिहिला. विलगीकरणात असतानाही त्याची सही घेतली.  विलगीकरणातील व्यक्तीला  भेटणे हा गुन्हा आहे. केवळ आज बैठक असल्याने घाईगडबडीत जबाब घेतला. अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरी जाऊन महसूल विभागाचे अधिकारी स्वतःच्या हाताने जबाब लिहितात, हे अतिशय चुकीचे आहे. ते काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही  घरी घेऊन गेले होते.
सुधीर लोकेकडून जबाबवर सही घेतली. हे अतिशय चुकीचे आहे. गुन्हा करणाऱ्या संस्थेशी शासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळेच असे प्रकार घडतात आणि फोफावतात.  गरीब त्यात भरडला जात आहे. संबंधित मायमर कॉलेजच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावाच, त्याचबरोबरच ज्यांनी मृत रुग्णाच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाच्या घरी जाऊन जबाबावर सही घेतली. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button