60 टक्के व्याजाने पैसे देणा-या खाजगी सावकारावर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी
दोन खाजगी सावकारांनी अवाच्या सवा व्याज आकारणी करून एका व्यक्तीला पैसे दिले. त्यासाठी 60.50 टक्के व्याज घेतले. कर्जदाराने पैसे देऊनही आणखी पैशांची मागणी करत दमदाटी केली. याप्रकरणी दोन खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 ते 23 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
हिरामण भिकू चौधरी, वैभव दिगंबर चौधरी (दोघे रा. गोलेगाव, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी विशाल कैलास बर्डे (वय 35, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून 60.50 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ राहुल कैलास बर्डे यांनी गोलेगाव येथील चौधरी यांच्या उसाच्या गु-हाळावर हरिभाऊ यांना घेतलेल्या सात लाख 50 हजार रुपयांचे व्याजासहित आठ लाख रुपये दिले. तरीही आरोपींनी आणखी तीन लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी विश्वासाने दिलेल्या तीन चेक पैकी एक चेक बाउन्स करून फिर्यादी यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली. व्याजाचे पैसे दिले नाहीत तर तुला बघून घेईन अशी दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.