breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी मनपा निवडणुकीत सत्तेची दिवास्वप्ने पाहणा-या राष्ट्रवादीला मोठा धक्का

  • नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद धोक्यात
  • महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना कारवाईचे पत्र

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 2022 ला सत्ता येण्याची दिवास्वप्ने पाहणा-या राष्ट्रवादीच्या संकटात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. नगरसेवकांच्या भ्रष्ट कामगिरीमुळे पक्षाच्या प्रतिमेला कलंक लागत आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या चुकीच्या कामकाजामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पालिकेच्या निविदाप्रक्रियेत आर्थिक फायदा घेतल्याच्या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी शिलवंत-धर यांच्यावर उचीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त राजेश पाटील यांना यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयातून पत्र पाठविण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या कुटूंबियांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मास्क पुरवठा निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. याची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन त्यांच्या कंपनीस महापालिकेने रक्कम देखिल अदा केली आहे. अशी तक्रार माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांकडे केली होती.

ननावरे यांच्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्तांनी दखल घेतली आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी त्यांचे पद रद्द करुन नगरसेवक म्हणून असलेले सर्व लाभ तात्काळ थांबविणेबाबतची मागणी ननावरे यांनी केली होती. या विषयी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांनी सदर अर्जावर आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करुन अर्जदार यांना कळविण्यात यावे, असे आदेश पुणे विभागीय कार्यालयातून 26 मार्च रोजी प्र. उपायुक्त, नगरपालिका प्रशासन, डॉ. प्रदिप ठेंगल यांनी दिले आहेत. तसे, पत्र पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडून माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांना देण्यात आले.

या विषयी ननावरे यांनी 10 मार्च 2021 रोजी पत्रकार परिषद घेऊन नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी ननावरे यांनी असे आरोप केले होते की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. 20 च्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंब सदस्यांनी महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. महापालिका अधिनियम 11 मधील पोटकलम ‘ड’ किंवा अप्रत्यक्षरित्या कलम 10, पोटकलम (2) खंड (ब) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे महापालिकेचा सदस्य किंवा महापालिकेच्या कोणत्याही समितीचा सदस्य या नात्याने काम करील, तर त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल. यामधील तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद रद्द होणे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुलक्षणा शिलवंत-धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महापालिका सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राव्दारे  दि. 10 मार्च 2021 रोजी केली असल्याची माहिती पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली होती.

ननावरे यांच्या पत्राला विभागीय आयुक्त कार्यालयातून महापालिका आयुक्त पाटील यांना पत्र आल्याने नगरसेविका शिलवंत-धर यांचे पद धोक्यात आले आहे. त्यांच्यावर उचीत कारवाई झाल्यास त्यांचे पद रद्द होण्याची शक्यता आहे. शिलवंत-धर यांच्या अशा भ्रष्ट कामामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन होत आहे. भाजप नगरसेवकांशी हात मिळवणी करून ठेकेदारीत सहभागी होण्यासाठी लांगूलचालन करणा-या नगरसेवकांमुळे पक्षाला हरताळ फासला जात आहे. त्याचा फटका आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button