breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकाकडुनच केराची टोपली; झाली ‘ही’ कारवाई

मुंबई –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच लग्नसोहळ्याला 50 लोक आणि अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे.

कल्याणमध्ये मात्र शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांनी नेमून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं असून नियमांना केराची टोपली दाखवल्याचं दिसून आलं. कल्याण-डोंबिवलीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले आणि माजी नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीचा विवाह भवानी मॅरेज हॉल येथे पार पडला असून या सोहळ्यादरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.

वाचा :-मुंबईत तब्बल 11,163, पुण्यात 12,494 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

लग्नसोहळ्यासाठी 50 लोकांनाच परवानगी असताना वायले यांनी शेकडो लोकांच्या उपस्थितीत आपल्या मुलीचा शाही विवाह सोहळा पार पाडला. या विवाह सोहळ्यात प्रशासनाने नेमून दिलेल्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नसल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी 1 नाही तर 2 विवाहसोहळे एकाच वेळी पार पडत होते.

संबंधित प्रकरणात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुलीचे वडील आणि माजी नगरसेवक सुनील वायले यांच्यासह दुसऱ्या विवाह सोहळ्यातील मुलीचे वडील सुरेश म्हात्रे आणि भवानी मॅरेज हॉलचं व्यवस्थापन बघणारे रमेश सिंह यांच्यावर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिका प्रशासन आणि राज्य शासनातर्फे वारंवार कोरोना नियमांचं पालन करण्यासंदर्भात जनजागृती सुरू आहे. परंतु नियमांचं पालन होत नसल्याने महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर बनत चालल्याचं निदर्शनास येते. आता मात्र सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाकडून अशी नियमांची पायमल्ली होत असेल तर नियम फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button