राज्यातील धरणांमध्ये ३०.८८ टक्के पाणीसाठा; पुणे विभाग सर्वात कमी पाणी

मुंबई: राज्यातील धरणांमध्ये ३०.८८ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षीच्या २७.८५ टक्के तुलनेत हा साठा अधिक असला तरी कडक उन्हाने पाण्याचा साठा आटत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ३०२८ धरणांमध्ये सध्या १२,६१२.५९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
एकूण प्रकल्पीय उपयुक्त क्षमता ४०,८४७.९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ४२.५७ टक्के पाणीसाठा असून नागपूर विभागात ३९.८९ टक्के साठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३४.३४ टक्के, कोकण विभागात ३५.७६ टक्के आणि नाशिक विभागात ३१.२३ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील स्थिती तुलनेने गंभीर असून तेथील धरणांमध्ये केवळ २२.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा – राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान
या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा तळाला पुणे विभागातील अनेक महत्त्वाच्या धरणांमधील साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. भाटघर धरणात ८.२६ टक्के, माणिकडोहमध्ये ६.११ टक्के, घोड धरणात अवघा १.७२ टक्के, तर टेमघर आणि लोणावळा टाटा धरणांमध्ये शून्य टक्के उपयुक्त साठा नोंदवण्यात आला आहे. नाशिक विभागातही काही धरणांची स्थिती गंभीर आहे.
भावली धरणात शून्य टक्के, अर्जुनसागरमध्ये ६.०८ टक्के आणि वाघाड धरणात केवळ ५.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.दुसरीकडे, नागपूर विभागातील कामठी खैरी धरणात ८४.६२ टक्के, भंडारा जिल्ह्यातील असोलामेंढा धरणात ६१.८४ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला प्रकल्पात ६१.४७ टक्के साठा असल्याने विदर्भातील परिस्थिती तुलनेने समाधानकारक असल्याचे दिसून येते. दरम्यान, यंदा एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने राज्य सरकारने जलसंधारण आणि पाणी वापर नियोजनावर भर दिला आहे. आगामी काही आठवडे पावसाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.




