Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

८ मुलं, घरदार नाही, खायला नाही, काळजावर दगड ठेवला अन् दोन वर्षाच्या पोटच्या गोळ्याला…

जळगाव: अठराविश्व दारिद्र्य, त्यात आठ मुलं, दुष्काळात तेरावा महिना म्हणजे करोनाच्या काळात पतीचे निधन झाले. लोकांकडून मागून मुलांना खावू घालणेही अवघड झाले. त्यामुळे बेघर फिरस्त्या महिलेने आपल्या पोटच्या दोन वर्षीय मुलाला सुरत येथील महिलेस अवघ्या दीड ते दोन हजारात विकण्याचा निर्णय घेतला. ही विक्री होण्यापूर्वीच पोलिसांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी मुलांसह या महिलेस ताब्यात घेवून महिला कल्याण समितीकडे पाठवले. चित्रपटातील कथा वाटावी अशी ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात एक ४० वर्षीय महिला पतीसह हातमजुरी करुन आपल्या आठ मुलांचा सांभाळ करीत होती. मात्र, करोनाच्या काळात या महिलेच्या पतीचे करोनामुळे निधन झाले. या महिलेस चार मुलं आणि चार मुली अशी आठ अपत्य आहेत. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी राहते. पतीच्या मृत्यूनंतर या महिलेवर उर्वरित सात मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. यातील चार मुले ही सहा वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. तर, तीन मुली या ६ ते १२ वयोगटातील आहेत.

पती नसल्याने मिळेल ती हातमजूरी करुन वेळप्रसंगी लोकांकडे मागून ही महिला प्रतिकुल परिस्थितीत मुलांचा सांभाळ करत होती. ती मुलांसह शहरातील फुटपाथवर राहयची. सात मुलांना खाऊ घालणं देखील अवघड व्हायला लागले होते. स्वत:सह मुलांच्या खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागल्याने ती हतबल झाली होती.

दीड हजारासाठी मुलाच्या विक्रीला तयार

हतबल झालेल्या या महिलेस तेथिलच एका व्यक्तीने मुलाची विक्री करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, गुजरात राज्यातील सुरत येथील एका महिलेस सर्वात लहान दोन वर्षाच्या मुलाला अवघ्या दीड हजार रुपयांना विकण्यासाठी ही महिला तयार झाली. तसेच, इतर मुलांचेही काही हजार रुपयात विक्रीचे व्यवहार ठरले असल्याची माहीती समोर येत आहे.

पोलिसांच्या सतर्कतेने टळला व्यवहार

दरम्यान, शहरातील एक गरीब महिला आपल्या पोटच्या मुलाची विक्री करणार असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ या महिलेचा शोध घेतला. भांबावलेल्या अवस्थेत या महिलेने पोलिसांना ७ मुलं असून त्यांचे संगोपन होत नसल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी या महिलेसह तिच्या मुलांना ताब्यात घेवून तिला जिल्हा बाल कल्याण समितीच्या स्वाधिन केले. महिला आणि मुलांना जळगावातील बालसुधारगृहात आणण्यात आले.

समितीने नोंदविला जबाब; मुले धुळ्याला पाठवणार

दरम्यान, जळगाव जिल्हा बाल कल्याण समितीने महिलेचा जबाब नोंदविला आहे. सात मुलांपैकी तीन मुली या सहा वर्षांवरील असल्याने त्यांना धुळे सुधारगृहात पाठविण्यात येणार आहेत. तर सहावर्षाखालील वयाची तीन मुलं जळगाव सुधारगृहात ठेवणार असून महिलेला शासकीय महिला वसतीगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली आहे.

अमळनेर शहरात महिला तिच्या मुलाला दुसऱ्याला देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्रीसाठी या महिलेसह तिच्या मुलांना ताब्यात घेतले. तिचा जबाब घेतल्यानतंर बालकल्याण समितीकडे दिले आहे. तिच्या पतीचे करोनाकाळात निधन झाले आहे. मुलांचे संगोपन करणे अवघड असल्याने दोन वर्षांच्या मुलास संगोपनासाठी देत असल्याचे सांगते. महिला सध्या भांबावलेल्या अवस्थेत आहे. याबाबत अधिक तपास समिती करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button