TOP Newsताज्या घडामोडीपुणे

७१ मतदान केंद्रे; २०० पेक्षा अधिक विद्यापीठ प्रतिनिधींची देखरेख

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक प्रक्रियेवर २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी देखरेख करणार असून पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार अधिसभेच्या पदवीधर गटात दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. अधिसभेवर पुढील पाच वर्षांसाठी या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. निवडणुकीविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी विद्यापीठात प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी या वर्गात मार्गदर्शन केले. निवडणूक विभागाच्या उपकुलसचिव डॉ. वैशाली साकोरे, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर साळुंखे उपस्थित होते. या वेळी मतदान प्रक्रियेची छोटेखानी रंगीत तालीम घेण्यात आली.

डॉ. पवार म्हणाले, अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. पदवीधरांच्या नावनोंदणीसाठी विद्यापीठाने बातम्या, पोस्टर, वृत्तपत्रातील जाहिरात आणि रेडिओ एफएमवरही जाहिरात केली. यामुळे यंदा विक्रमी १ लाख २० हजार पदवीधरांनी नोंदणीसाठी अर्ज केले. निवडणुकीसाठी विद्यापीठाची त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. एक हजार मतदारांमध्ये एक बूथ प्रतिनिधी असे ११४ बूथ असणार आहेत. तर पाच हजार मतदारांमध्ये एक केंद्र निरीक्षक आहे. प्रत्येक बूथवर एक प्रतिनिधी असेल अशी ७१ मतदान केंद्रे असतील. त्यात पुणे शहरात २६, पुणे ग्रामीण येथे १०, अहमदनगर जिल्ह्यात १५ , नाशिक जिल्ह्यात १९, तर सिल्वासा येथे एक मतदान केंद्र असेल. या ७१ मतदान केंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यापीठातील ७४ प्राध्यापक व अधिकारी केंद्र निरीक्षक, तर ११४ विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी बूथ प्रतिनिधी म्हणून काम करतील.

पदवीधर गटातील दहा जागांसाठी ३७ उमेदवारांचे अर्ज

पदवीधर मतदारसंघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी चार उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी चार उमेदवार, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

विद्यापीठ निवडणूक ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. कायद्यानुसार नेमणूक केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निवडणूक प्रक्रियेला खंबीरपणे सामोरे जावे.

– डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button