Mahaenews

गडचिरोलीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३३ नक्षलवादी ठार

Share On

नागपूर: गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३३ नक्षलवादी ठार झाले आहेत. सोमवारी गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. गेल्या दोन दशकातील नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाई नंतर भारतीय जवानांनी प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर ताल धरत जल्लोषही साजरा केला.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान रविवार आणि सोमवारी जोरदार चकमक उडाली. रविवारच्या कारवाईत सुरक्षा दलाने १६ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्यानंतर सोमवारी झालेल्या कारवाईत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. आज गडचिरोलीच्या जंगलात सर्च ऑपरेशन्स सुरू असताना इंद्रावती नदीत ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह वाहत आल्याचं दिसून आलं. त्यामुळे गेल्या दोन दिवसाच्या कारवाईत एकूण ३३ नक्षलवादी मारले गेल्याचं स्पष्ट झालं आहे. ही कारवाई जिमालगट्टा परिसरातील राजाराम खांदला जंगलात झाली. कारवाईत सी-६- कमांडोही सहभाही झाले होते. मारल्या गेलेल्या ३३ नक्षलवाद्यांपैकी आतापर्यंत ११ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, गेल्या दोन दशकातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई यशस्वी पार पडल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ या सुपरडूपर हिट गाण्यावर ताल धरत एकच जल्लोष साजरा केला. त्या आधी पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर ‘सैराट’ चित्रपटातील गाण्यावर जवानांनी ताल धरला होता. दरम्यान, आमदार पांडूरंग वरोरा, वैभव पिचड, आनंद ठाकूर, शांताराम मोरे आणि अमित घोडा आदी आमदारांना मारण्यासाठी हे नक्षलवादी आले होते असं सूत्रांनी सांगितलं.

Exit mobile version