धक्कादायक! पतीने दिला त्रास, पत्नीने खाल्ल्या थायरॉईड आजाराच्या 50 गोळ्या
पिंपरी | प्रतिनिधी
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने थायरॉईड आजाराच्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार साने चौक, चिखली येथे घडला. घराचे आणि कारचे कर्ज फेडण्यासाठी पती माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होता. त्यावरून तो पत्नीला मारहाण देखील करत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमोल मारुती भंडारे (वय 37, रा. साने चौक, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने घराचे आणि कारचे कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे त्यांच्या आई वडिलांकडून वेळोवेळी पैसे आणण्याची मागणी केली. मागणीनुसार पैसे दिले नाहीत म्हणून पतीने माहेरच्या लोकांवरून टोमणे मारून मारहाण व शिवीगाळ केली. रात्री अपरात्री दारू पिऊन येऊन पती फिर्यादीला मारहाण करत असे. तसेच पतीने फिर्यादी विवाहितेला उपाशी ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून गुरुवारी (दि. 2) विवाहितेने थायरॉईड आजारावरील 50 गोळ्या खाल्ल्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.