ताज्या घडामोडीमुंबई

पश्चिम रेल्वेच्या ६२ कर्मचाऱ्यांसह ४८६ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या संसर्गाचा वेगाने फैलाव होत असून बाधित होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असून पश्चिम रेल्वेकडून महालक्ष्मी येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना चाचणी शिबिरात लोअर परळ, महालक्ष्मी कारखान्यातील ६२ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस प्रशासनात देखील कोरोनाने शिरकाव केला असून मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.दरम्यान पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी रेल्वे कारखाने व अन्य कार्यालयांजवळ कोरोना चाचणीचे शिबीर मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्यानंतर अनेक जण बाधित आढळत आहेत. परंतु बहुतांश कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना सौम्य व अति सौम्य लक्षणे असून उपचारानंतर ते बरेही झाले आहेत. लक्षणांची तीव्रता अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांनीही रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत शनिवारी २० हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचा कहर सुरु आहे. राज्यात शनिवारी नव्या ४१ हजार ४३४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या १००९ वर गेली असून त्यापैकी ४३९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

विश्वास नांगरे पाटील कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ४८६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १०४ पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे .

सीबीआयच्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोना
सीबीआयच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कार्यालयात शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला. शनिवारी ६८ कार्यालयीन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. २३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संसद भवनात ४०० कर्मचाऱ्यांना कोरोना
कोरोनाचा कहर आता दिल्लीतील संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. संसद भवनातील ४००हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ६ आणि ७ जानेवारीला संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली होती, त्यामध्ये ४०० हून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव
देशात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयातही करोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सहा न्यायाधीश कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. याआधी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीश कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय, रजिस्ट्री विभागातील सुमारे १५० कर्मचारी देखील पॉझिटिव्ह असून क्वारंटाईनमध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button