46 टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक

पुणे – शहरात कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या महिलांचे आरोग्य धोक्यात असल्याचे धक्कादायक निष्कर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आले आहे. विद्यापीठाच्या या अभ्यासातून 46 टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक आहे तर 70 टक्के महिलांना सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास होत आहे. या अभ्यासातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार शहरातील कचरावेचकांमध्ये अनुसूचित जातींच्या महिलांचाच समावेश आहे.
शहरात राहूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांच्या परिस्थितीचा आढावा नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने घेतला. यामध्ये कचरावेचक महिलांना दैनंदिन काम करताना येणाऱ्या समस्यांवर अभ्यास व संशोधन करण्यात आले असल्याची माहिती या संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख व समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. श्रुती तांबे यांनी दिली. या महिलांना स्वच्छता कामगार म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असे मत प्रा. तांबे यांनी व्यक्त केले. याविषयी सांगताना सहयोगी संशोधक स्नेहा झुंजरुटे म्हणाल्या की, कागद – काच – पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ या संस्थांच्या सहकार्याने आम्ही ही पाहणी केली. यामध्ये पुणे शहरातील सहा वॉर्डसमधील 100 कचरा वेचकांच्या समस्या (विशेषत: आरोग्यविषयक समस्या व आव्हाने) समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासण्यात आल्या. या अभ्यासांतर्गत एकूण 100 महिलांपैकी 18 महिलांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या. तर उर्वरित महिलांचे सर्वेक्षण केले.
पाहणीतून समोर आलेली महत्त्वाची निरीक्षणे
-कचरावेचक म्हणून कार्यरत महिलांपैकी फक्त 15 टक्के महिलांचे आरोग्य चांगले, 46 टक्के कचरावेचकांचे आरोग्य चिंताजनक तर 39 टक्के महिलांचे आरोग्य सर्वसाधारण आहे.
– श्रीमंत वस्त्या किंवा झोपडपट्टीचा भाग असो, कुठेही या महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. जी स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत, तेथे त्यांना मज्जाव केला जातो. यातून प्रजनन आरोग्याचे व किडनीविषयक समस्या निर्माण होतात.
– बहुतेक सर्व महिला या अनुसूचित जातींमधील आहेत. यापैकी मातंग समाजाच्या महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे 50 टक्के इतकी आहे. महार जातीच्या महिलांची संख्या 32 टक्के, तर नवबौद्ध समाजातील महिलांची संख्या 10 टक्के आहे. उर्वरित जाती-जमातींमधून प्रमाण 8 टक्के आहे.
– या क्षेत्रातील 70 टक्के महिलांना मोठ्या प्रमाणात सांधेदुखी आणि अंगदुखीचा त्रास आहे. 51 टक्के महिलांचे डोळे कमजोर आहेत तर 27 टक्के महिलांना मासिक पाळीच्या काळात ताप आणि कमजोरी, योनीमार्गात जंतुसंसर्ग, पायात गोळे येणे अशा आरोग्यविषयक समस्या आहेत.
– तब्बल 58 टक्के महिला या जनआरोग्य विमा योजनेपासून वंचित आहेत.
– कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत सुशिक्षितांमध्ये अनास्था आहे. अवर्गीकृत कचऱ्याचे वर्गीकरण करताना 55 टक्के महिलांना कापणे खरचटणे आदींचा समाना करावा लागतो.
– सुमारे 28 टक्के महिलांना कचरा गोळा करताना मोकाट जनावरे व कीटकांचा त्रास होतो.
– प्रश्नोत्तरांच्या तासात 72 टक्के महिलांनी कामासाठी आवश्यक साधने दिली जातात, असे सांगितले तरी सविस्तर मुलाखतीवेळी या स्वच्छता साधनांच्या दर्जावर प्रश्नच उभे केले आहेत. विशेषतः बूट आणि हातमोजांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांना टाचा आणि पायाची बोटे उघडी राहतील, असे सॅन्डल दिले जातात, अशी तक्रारही यावेळी अनेकींनी नोंदवली.
– इतक्या वाईट परिस्थितीत काम करूनही त्यांना आरोग्य विमा किंवा कामगार हा दर्जा दिला जात नाही.
- विद्यापीठाकडून महिला समस्यांचा अभ्यास : महिलांसाठी शौचालयच नाही
– अनुसूचित जातींच्या महिलांचाच समावेश
– 70 टक्के महिलांना अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास
– 39 टक्के महिलांचे आरोग्य सर्वसाधारण
– 51 टक्के महिलांचे डोळे कमजोर
– 28 टक्के महिलांना मोकाट जनावरे, कीटकांचा त्रास